प्रेरणादायी स्टोरी... भंगार विकणाऱ्याच्या मुलाने दोन वर्षांत केल्या तब्बल इतक्‍या परीक्षा उत्तीर्ण, आता आला राज्यातून प्रथम

Mohammed Shahid first in the state in the tax assistant examination
Mohammed Shahid first in the state in the tax assistant examination

दर्यापूर (जि. अमरावती) : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाद्वारे घेण्यात आलेल्या करसहायक-2020च्या परीक्षेचा निकाल 21 जुलै रोजी जाहीर झाला. या परीक्षेत विदर्भातील अनेक युवकांनी घवघवीत यश संपादन केले. गरिबीवर मात करीत युवकांनी हे यश संपादन केले आहे. यात अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्‍यातील मोहंमद शाहीद या विद्यार्थ्याचाही समावेश आहे. त्याचे हे यश सर्वसामान्यांना प्रेरणा देणारे ठरले आहे. 

मोहंमद शाहीद मोहंमद अयुब हा युवक दर्यापूर शहरातील राठीपुरा, मदिना मशिदीजवळील अतिशय प्रतिकूल परिस्थिती राहतो. त्याचे वडील भंगार व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवितात. सामान्य कुटुंबातील शाहीदने वयाच्या 27व्या वर्षी करसहायक परीक्षेत राज्यात प्रथम येऊन आपल्या कुटुंबासह जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. त्याच्या यशात मार्गदर्शक प्रा. गजानन कोरे आणि मोठा भाऊ वर्धा येथे लिपीकपदावर कार्यरत मोहंमद रेहान यांचा सिंहाचा वाटा आहे. 

स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासाठी मोठ्या शहरात जावे लागते, हा अनेकांचा समज खोटा ठरवत मोहंमद शाहीद याने अभ्यासातील सातत्य, नियोजन, सराव या भरवशावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या करसहायक परीक्षेत राज्यात प्रथम येणाचा मान पटकावला आहे. यामुळे दर्यापूर शहराच्या इतिहासात नवा मानाचा तुरा रोवला गेला आहे. 

कोरोनाच्या संकटात सर्व भरती प्रक्रिया थांबलेली असताना ग्रामीण भागातील स्पर्धापरीक्षेच्या विद्यार्थ्यांना दर्यापूर शहरातील मोहंमद शाहीद या युवकाने जगण्याची नवी दिशा निर्माण केली आहे. या यशाबद्दल दर्यापूर येथील बहुजन राष्ट्रनिर्माण प्रशासकीय अकादमी संचालक प्रा. गजानन कोरे, समन्वयक डॉ. अभय गावंडे, मार्गदर्शक सुनील लव्हाळे, ऍड. विद्यासागर वानखडे आदींनी अभिनंदन केले आहे.

दोन वर्षांत अनेक परीक्षा उत्तीर्ण

मोहंमद याने दोन वर्षांत अनेक परीक्षा उत्तीर्ण केल्या. यामध्ये पोस्ट ऑफिस सहायक-2017, कर सहायक-2018, परिवहन महामंडळ सुरक्षानिरीक्षक -2019, पाठ्यपुस्तक महामंडळ पुणे लिपीक-2019, मंत्रालय कनिष्ठ लिपीक-2019 आणि आता महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची कर सहायक 2020 आदी परीक्षा त्याने उत्तीर्ण केल्या. 

फक्त ध्येय मजबूत पाहिजे 
अभ्यासात सातत्य, कठोर परिश्रम, नियमित सराव केला तर कोठेच जाण्याची गरज नाही. सर्व अभ्यास तुम्ही जेथे आहात तेथेच होते, फक्त ध्येय मजबूत पाहिजे. 
- मोहंमद शाहीद, करसाहायक

संपादन - नीलेश डाखोरे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com