संस्था संचालकाचे 5.83 लाख लंपास 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नागपूर : वर्धा मार्गावरील चिंचभवन परिसरात पतसंस्था संचालकाच्या वाहनातून आरोपीने 5.83 लाखांची रोकड लंपास केली. पोलिसांनी जुनी वस्ती, चिंचभवन निवासी प्रेमराज नाना बोबडे (58) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. 

नागपूर : वर्धा मार्गावरील चिंचभवन परिसरात पतसंस्था संचालकाच्या वाहनातून आरोपीने 5.83 लाखांची रोकड लंपास केली. पोलिसांनी जुनी वस्ती, चिंचभवन निवासी प्रेमराज नाना बोबडे (58) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदविला आहे. 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रेमराज बोबडे हे खापरीतील चक्रधर स्वामी महिला ग्रामीण बिगर शेती पतपुरवठा संस्थेचे संचालक आहे. संस्थेतर्फे विविध योजना राबविण्यात येतात. दैनिक बचत योजनेअंतर्गत दुकानदारांकडून पैसे गोळा केले जातात. बोबडे स्वत:ही कलेक्‍शनचे काम करतात. 4-5 दिवसांमध्ये जमा केलेले 5.83 लाख रुपये त्यांना वर्धा मार्गावरील खासगी बॅंकेत जमा करायचे होते. शुक्रवारी सकाळी 11.30 वाजताच्या सुमारास बोबडे पैसे घेऊन बॅंकेत जमा करण्यासाठी निघाले. पैशांची थैली त्यांनी मोपेडच्या हुकला टांगली होती. रस्त्यात त्यांच्या लक्षात आले की, चिंचभवनच्या कल्याण अपार्टमेंटमधील वैशाली मेडिकल स्टोअरकडूनही दैनिक बचतीचे 1,100 रुपये घ्यायचे आहेत. त्यांनी अपार्टमेंटसमोर वाहन उभे केले आणि मेडिकल स्टोअरमध्ये पैसे घेण्यासाठी गेले. त्यांची पैशांची थैली वाहनालाच टांगली होती. 10 मिनिटांनंतर ते परतले असता पैशांची थैली गायब होती. त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. 
बेलतरोडी पोलिस घटनास्थळावर पोहोचले. पोलिसांनी बोबडे यांच्याकडून घटनेची सविस्तर माहिती घेतली असता कोणाचाही चोरीच्या घटनेवर विश्‍वासच बसत नव्हता. बोबडेच्या घरापासून केवळ 10 मिनिटे अंतरावरच बॅंक होती. इतकी मोठी रक्कम जवळ असतानाही वाहनातच थैली सोडून मेडिकल स्टोअरमध्ये 1,100 रुपये आणण्यासाठी जाण्याची गोष्ट पोलिसांच्या पचनी पडत नव्हती. तपासानंतर पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Money snatched form trader