विदर्भात 15 जूननंतर मॉन्सून

file photo
file photo

नागपूर : सध्या भीषण पाणीसंकटाचा सामना करीत असलेल्या विदर्भात यंदा मॉन्सूनचे आगमन 15 जूननंतर होण्याची दाट शक्‍यता आहे. तसे संकेत प्रादेशिक हवामान विभागाने दिले आहेत.
हवामान विभागाचे संचालक मोहनलाल साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळमध्ये मॉन्सून दाखल झाल्यानंतर साधारण दहा ते बारा दिवसांमध्ये विदर्भात आगमन होते. भारतीय हवामान विभागाने सहा जूनला केरळच्या किनारपट्‌टीवर मॉन्सूनचे आगमन होणार असल्याचे भाकीत वर्तविले आहे. ठरलेल्या तारखेनुसार, मॉन्सूनचे सहा तारखेला केरळमध्ये आगमन झाले आणि मॉन्सूनचा पुढील प्रवास कायम राहिल्यास विदर्भात 15 जूननंतर मॉन्सूनचा जोरदार पाऊस अपेक्षित आहे. याउलट मॉन्सूनच्या प्रवासात अडथळे आले आणि मध्येच कमजोर पडल्यास आगमन लांबणीवर पडू शकते. विदर्भात साधारणपणे दुसऱ्या आठवड्यात मॉन्सूनचे आगमन होते. मात्र, यावर्षी केरळमध्येच पाच ते सहा दिवस उशिरा आगमन होत असल्याने, विदर्भातही मॉन्सूनच्या आगमनाला थोडा उशीर होणार आहे. गतवर्षीच्या तुलनेत मॉन्सूनची गाडी यावेळी थोडी विलंबाने येणार आहे. स्कायमेट या खासगी संस्थेने केरळमध्ये चार जूनला मॉन्सून येणार असल्याचे सांगितले.
गेल्या वर्षी विदर्भात मॉन्सूनचे अपेक्षेपेक्षा लवकर म्हणजेच आठ जूनला आगमन झाले होते. पावसाळ्यात 875.4 मिमी पाऊस पडला होता, जो सरासरीच्या (954.6 मिमी) आठ टक्‍के कमी होता. हवामान विभागाने यंदा संपूर्ण भारतात सरासरीच्या 96 टक्‍के पावसाची शक्‍यता वर्तविली आहे. स्कायमेटनेही सरासरीइतकाच पाऊस राहणार असल्याचे भाकीत वर्तविले. त्याचवेळी जून आणि ऑगस्ट महिन्यात मोठा खंड पडण्याचीही दाट शक्‍यता आहे, जी विदर्भातील शेतकऱ्यांसाठी धोक्‍याची घंटा मानली जात आहे. जुलै महिन्यात मात्र दमदार पाऊस पडणार असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
मागील पाच वर्षांत
मॉन्सूनचे विदर्भातील आगमन
वर्ष तारीख पडलेला पाऊस घट/वाढ
2018 8 जून 875.4 मिमी -8
2017 16 जून 731.5 मिमी -23
2016 18 जून 1044.8 मिमी +9
2015 13 जून 848.2 मिमी -11
2014 19 जून 817.5 मिमी -14
आजपासून तीव्र लाट
हवामान विभागाने उद्या, शुक्रवारपासून पुढील पाच दिवस संपूर्ण विदर्भात तीव्र उष्णलाटेचा इशारा दिल्याने उन्हाचा तडाखा आणखीन वाढणार आहे. विशेषत: नागपूर, चंद्रपूर, वर्धा आणि यवतमाळ या चार जिल्ह्यांमध्ये लाटेचा अधिक प्रभाव दिसणार आहे. नागपूर व चंद्रपूरमध्ये पारा 47 अंशांवर जाण्याची शक्‍यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com