बळीराजा जरा धीरानं; पावसाची हजेरी अन् पेरणीची लगबग

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

महाराष्ट्रात यंदा सरासरी १०२ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदभाकडे माॅन्सून मार्गस्थ आहे. काही भागात जोरदार पाऊससुद्धा पडला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सरासरी ६५ मिमी पाऊस पडेपर्यंत पेरणीची घाई करू नये. तसेच दोन ते तीन फूट खोल ओलावा निर्माण होऊ द्यावा.
- रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, पुणे

अकोला : ढगाकडे टक लावून बसलेला शेतकरी पावसाची पहिली सर कोसळताच आनंदविभोर झाला. दोन दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस पडल्याने, पेरणीसाठीची लगबग वाढली अाहे. खते, बी-बियाणे इत्यादी शेतीपयोगी वस्तू खरेदीला जोर आला आहे. मात्र, सरासरी १०० मिमी पाऊस पडेपर्यंत तसेच जमिनीमध्ये दोन ते तीन फूट खोल ओलावा निर्माण होत नाही तोपर्यंत पेरणी करण्याची शेतकऱ्यांनी घाई करू नये, असा सल्ला कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी दिला आहे.

साधारणपणे १ जून ते ३० सप्टेंबर हा मॉन्सूनचा कालावधी समजला जातो. यंदा मॉन्सूनचे लवकर आगमन होणार असल्याचे भाकीत हवामान वेधशाळेने वर्तविले होते. महाराष्ट्रातील काही भागात माॅन्सूनचे आगमन झाले असून, विदभाकच्या दिशेने तो वेगाने सरकत अाहे. त्यामुळे अकोल्यासह वऱ्हाडात १२ ते १३ जूनपर्यंत मॉन्सूनचे आगमन निश्चित मानले जात आहे. त्याची पूर्वसूचना म्हणून, तीन दिवसांपासून जिल्ह्यातील बहुतांश भागात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. मात्र, अद्याप पेरणीसाठी आवश्यक वातावरण अद्याप निर्माण झाले नाही. परंतु, सर्वत्र ढग दाटून आल्याने, जोरदार पावसाचे संकेत मिळत आहेत. हवामान वेधशाळेनेसुद्धा १०, ११, १२, १३ जूनरोजी वऱ्हाडासह विदर्भात जोरदार पावसाची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीसाठीची लगबग सुरू केली असून, कृषी सेवा केंद्रांवर खते, बियाणे खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. परंतु, शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाने दिला आहे.

बियाणे निवड करा जपून
मॉन्सून तोंडवर असल्याने शेतकऱ्यांनी बियाणे खरेदीला धूम ठोकली आहेे. मात्र, बियाणे खरेदी करताना, प्रमाणित, शिफारसीत वाणांची निवड करून नोंदणीकृत केंद्रावरूनच खरेदी करावी. बियाणे पिशवीवर मुदत, किंमत व कंपनीची खात्री करावी. बियाणे खरेदी पश्चात विक्रेत्यांकडून पक्के बिल घेणे आवश्यक असल्याची माहिती कृषी तज्ज्ञांनी दिली आहे.

महाराष्ट्रात यंदा सरासरी १०२ मिमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. विदभाकडे माॅन्सून मार्गस्थ आहे. काही भागात जोरदार पाऊससुद्धा पडला आहे. मात्र, शेतकऱ्यांनी सरासरी ६५ मिमी पाऊस पडेपर्यंत पेरणीची घाई करू नये. तसेच दोन ते तीन फूट खोल ओलावा निर्माण होऊ द्यावा.
- रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ, पुणे

Web Title: monsoon arrives farmer work starts