तोंडाला मास्क लाव गं सूनबाई, मग जा अपुल्या माहेरा!

दिनकर गुल्हाने
Saturday, 31 October 2020

"गाई गाई दूध दे, दूध माझ्या बगळ्याला, बगळ्या बगळ्या गोंडे दे, गोंडे माझ्या राजाला, तेच गोंडे लेऊ सासरला जाऊ, सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे, पंढरीच्या वाटे नारळ फुटे." माहेरी आलेल्या मुलीला सासरला निघताना माहेर सोडवत नाही व सासरचा दुरावाही सहन होत नाही.

पुसद (जि. यवतमाळ) : आश्विन पौर्णिमा अर्थातच कोजागरी पौर्णिमेला हमखास आठवण येते भुलाबाईची अन्‌ तिच्या भुलोजी राणाची. या दोघांची म्हणजे शंकरपार्वतीची मातीची, चटक रंगात रंगवलेली जोडमूर्ती, त्यात मातेच्या मांडीवर बसलेला बाळ गणेश अशी घरी येताच कोवळ्या-सोहळ्या मुलींच्या भुलाबाईच्या गाण्यांना मोठी रंगत येत असे.

"पहिली गं पूजाबाई देवा देवा सा देव, साथीला खंडोबा खेळी खेळी खंडोबा" या गाण्याने सुरुवात झाली की, खिरापतीच्या गाण्यापर्यंत भुलाबाईच्या सुसाट गाण्यांची विदर्भ एक्‍स्प्रेस धावत असे. सुरुवातीला एक महिना चालणारा हा भुलाबाईंचा सोहळा अलीकडे पाच दिवसांवर व आता तर एक दिवसावर सीमित झाला आहे. किंबहुना, कालबाह्य होण्याच्या मार्गावर आहे.

अधिक वाचा - ...अन् शोकाकुळ नातेवाईक मृतदेह विसाव्यावर सोडून सैरावैरा पळू लागले

तथापि, खेड्यात भुलाबाईची संस्कृती जपण्याचा थोडाफार प्रयत्न दिसून येतो. खरे पाहता भुलाबाईची गाणी ही मुलींवरील संस्कार व संसाराची उत्स्फूर्त अशी परंपरागत गाणी आहेत. या लोककाव्यांत माहेर-सासर, चाली-रीती, व्यवहार-नीती अशा सर्वच मूल्यांचा उलगडा होतो. विशेष म्हणजे ही गाणी लहान मुलींपासून ते आजीपर्यंत तोंडपाठ असत. घरातील लहान मुलींना भुलाबाईच्या गाण्यांचे खूप वेड. मैत्रिणींसोबत घरोघरी भुलाबाईचे गाणे म्हणताना दम लागेपर्यंत उंच आवाजातील गाण्यांचा बाज अंगण दणाणून सोडत असे.

"आपे दुधी तापे, त्यावर पिवळी साय, लेकी भुलाबाई, साखळ्यांचा जोड, कशी लेऊ दादा, घरी नंदा जावा, करतील माझा हेवा" भुलाबाईच्या प्रत्येक गाण्यात सासर व माहेर यातील गोडवा, कडवट अनुभव त्यांची सुंदर गुंफण पाहावयास मिळते. "नंदा भावजया दोघी जणी दोघी जणी... घरात नाही तिसरं कोणी तिसरं कोणी, शिक्‍यातलं लोणी खाल्लं कोणी तेच खाल्लं वहिनीनी वहिनीनी, आता माझे दादा येतील गं येतील गं, दादाच्या मांडीवर बसील गं बसील गं, दादाची बायको चोट्टी चोट्टी, असू दे माझी चोट्टी चोट्टी, घे काठी लगाव काठी घरादाराची लक्ष्मी मोठी." भुलाबाईच्या गाण्यांमधून नंदा-भावजया यांच्यातील 'मधुर' संबंधांवर नेमके भाष्य केलेले आढळते.

क्लिक करा - जीवलग मित्राने दिला दगा; गर्भवती झाल्यानंतर उचलले टोकाचे पाऊल

"गाई गाई दूध दे, दूध माझ्या बगळ्याला, बगळ्या बगळ्या गोंडे दे, गोंडे माझ्या राजाला, तेच गोंडे लेऊ सासरला जाऊ, सासरच्या वाटे कुचू कुचू दाटे, पंढरीच्या वाटे नारळ फुटे." माहेरी आलेल्या मुलीला सासरला निघताना माहेर सोडवत नाही व सासरचा दुरावाही सहन होत नाही.

"नदीच्या काठी राळा पेरला, बाई राळा पेरला, एके दिवशी काऊ आला, बाई काऊ आला, एकच कणीस तोडून नेलं, बाई तोडून नेलं सईच्या अंगणात टाकून दिलं बाई टाकून दिलं." ही गाणी जाताना मुलींमध्ये प्रचंड उत्साह असतो. सासर-माहेरच्या तुलना करताना संसाराचे रुपडे अधिकच गडद झालेले दिसते.

हेही वाचा - शेतकऱ्याला अखेर मिळाले पिकविम्याचे पैसे; रक्कम वाचून बसेल धक्का

सासूवरही पडला कोरोनाचा प्रभाव

"कारल्याची बी पेर गं सूनबाई, मग जा अपुल्या माहेरा माहेरा, कारल्याची बी पेरली हो सासुबाई, आता तरी धाडा ना धाडा ना" या गाण्यातून सासू-सुनेच्या नात्याची वीण अधिक घट्ट झालेली दिसते. आजच्या कोरोनाचा प्रभावही सासूवर पडलेला दिसतो, तो असा : "तोंडाला मास्क लाव गं सूनबाई, मग जा अपुल्या माहेरा, माहेरा."

संपादन - नीलेश डाखोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The month-long Bhulabai ceremony is now limited