रस्ता भटकलेला 'जान' तासाभरातच आईच्या कुशीत, मूल पोलिसांच्या प्रयत्नाला यश

विनायक रेकलवार
Sunday, 22 November 2020

भटकलेला जान आईच्या कडेवर पाहून कुटुंबीयांनीसुद्धा आनंद व्यक्त करीत मूल पोलिसांचे आभार मानले आहेत. ही घटना शनिवारी (ता. 21) सकाळी घडली. सिंदेवाही तालुक्‍यातील पेटगाव येथील मेश्राम परिवार मूल येथील नातेवाईकांकडे भाउबिजेनिमित्त आले होते.

मूल ( जि. चंद्रपूर ) : गाव नवीन, रस्ता नवीन आणि घराशेजारील माणसेही नवीन. अशा परिस्थितीत रस्ता चुकलेला एक तीन वर्षीय जान नावाचा मुलगा रडत बसलेला असताना त्याला एका तासाच्या आत आईच्या कुशीत सुखरूप पोहोचविण्याची किमया मूल पोलिसांनी साधली आहे. 

हेही वाचा - हृदयस्पर्शी! मुळ गावी जाण्यासाठी कुटुंबीयांसह निघाला पती; वाटेत पत्नीने सोडली साथ,...

भटकलेला जान आईच्या कडेवर पाहून कुटुंबीयांनीसुद्धा आनंद व्यक्त करीत मूल पोलिसांचे आभार मानले आहेत. ही घटना शनिवारी (ता. 21) सकाळी घडली. सिंदेवाही तालुक्‍यातील पेटगाव येथील मेश्राम परिवार मूल येथील नातेवाईकांकडे भाउबिजेनिमित्त आले होते. त्यांचे नातेवाईक कृषी  उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात राहतात. शनिवारी सकाळी याच परिसरात एक तीन वर्षीय मुलगा घाबरलेल्या अवस्थेत रडत बसलेला आढळला. या परिसरात राहणारे रवी मेश्राम यांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने मूल पोलिसांना याची माहिती दिली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पोलिस उपनिरीक्षक राठोड यांनी घटनास्थळ गाठून मुलाला ताब्यात घेतले. विश्‍वासात घेऊन मुलाची चौकशी केली असता त्याचे नाव जान प्रमोद मेश्राम (रा. पेटगाव)असे असल्याचे समजले. परंतु, मुलाच्या आई वडीलांचा शोध घेण्याचे आव्हान समोर असताना त्यांनी एक तासाच्या आत पालकांचा शोध घेतला. 

हेही वाचा - काय? विधानभवनावर चाळीस लाखांचा मालमत्ता कर थकीत;...

सर्व चौकशीअंती जानला आई वडिलांच्या स्वाधीन करण्यात आले. अनोळखी परिसरामुळे रस्ता चुकलेला जान आईच्या कुशीत जाताच त्याच्या चेहऱ्यावर आनंदाचे कारंजे उडायला लागले. कुटुंबीयांनीही भटकलेला जान मिळताच त्यांच्याही जीवात जीव आला.  पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे मुलगा सुखरूप मिळाल्याने मेश्राम कुटुंबीयांनी पोलिसांचे आभार मानले. ही मोहीम पोलिस निरीक्षक राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय राठोड, सहकारी पोलिस कर्मचारी शाफिक, संजय, शालिनी यांनी राबविली.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mool police search boy who lost from home in chandrapur