..अन बहिणीच्या लग्नासाठी जमवलेले पैसे चक्क रस्त्यावर ठेवले वाळत; महापुराने जनजीवन विस्खळीत

अथर्व महांकाळ 
Thursday, 3 September 2020

वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचा अख्खा संसार पाणीपाणी झाला आहे. कोणाकडे मंगल कार्य तर कोणाकडे गणपती अशा आनंदी वातावरणात असणाऱ्या कुटुंबांच्या डोळ्यात पूरपरिस्थितीने अक्षरशः अश्रू आणले आहेत.

भंडारा: गेल्या काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात वैनगंगेच्या पुराने अक्षरशः थैमान घातले आहे. विशेष म्हणजे पाऊस नसतानाही पूर आल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. अचानक धरणांतून पाण्याचा विसर्ग केल्यामुळे नदीकाठच्या गावांना याचा प्रचंड फटका बसला आहे. काही कुटुंबांवर यामुळे आता जगावे कसे? अशी स्थिती निर्माण झाली आहे.  भंडाऱ्यातील एका कुटुंबावर अक्षरशः पुराच्या पाण्यात ओले झालेले पैसे रस्त्यावर वाळवण्याची वेळ आली आहे. 

वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे नागरिकांचा अख्खा संसार पाणीपाणी झाला आहे. कोणाकडे मंगल कार्य तर कोणाकडे गणपती अशा आनंदी वातावरणात असणाऱ्या कुटुंबांच्या डोळ्यात पूरपरिस्थितीने अक्षरशः अश्रू आणले आहेत. भंडारा जिल्ह्यातील वैनगंगेच्या काठावर राहणाऱ्या निबार्ते कुटुंबावरही अशीच स्थिती ओढवली आहे. 

हेही वाचा - कोरोनाबाधितांच्या अंत्यसंस्कारात वापरलेले साहित्य उघड्यावर; वाढला धोका

अचानक धरणांतून पाणी सोडले आणि नद्या फुगल्या. यामुले गावात आणि लोकांच्या घरात पाणी शिरले. घरातील सर्व वस्तू जलमय झाल्या. दुर्दैव म्हणजे बहिणीच्या लग्नासाठी जमवलेले पैसेसुद्धा पुराच्या पाण्यात ओलेचिंब झाले. निंबर्ते कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर पसरला. अखेर पाण्यात भिजलेल्या नोटा त्या भावाला रस्त्यावर वाळवण्याची वेळ आली.    

निंबार्ते यांची कन्या काजल हिचे पुढच्या महिन्यात लग्न आहे. त्यासाठी तिच्या बेलदारीचे काम करणाऱ्या भावाने मोठया कष्टाने  पाईपाई जमा करून बहिणीच्या लग्नासाठी पैसे गोळा केले, गहू, तांदूळ घेऊन  ठेवलं होत.  मात्र निसर्गाच्या प्रकोपामुळे यांचं सगळं या पुरात वाहून गेलं. आता मुलीचं लग्न कस करावं असा प्रश्न या कुटुंबासमोर समोर उपस्थित झाले आहे. 

क्लिक करा - कंत्राटदाराकडून खंडणी न आणल्याने नक्षलवाद्यांनी आपल्याच समर्थकाला संपविले

तब्बल इतक्या गावांना पुराचा फटका

पुरामुळे जिल्ह्यातच तब्बल 18, 192  कुटुंबाचा संसार उघड्यावर आला आहे. बऱ्याच लोकांचे किराणा व्यापार, कापडाचा व्यापार, अन्न धान्याच्या व्यापार या पुराच्या पाण्यात बुडाला आहे. शेकडो लोकांनाचे घरे पडली आहेत. न राहायला घर, न खायला अन्न न अंगावर घालण्यासाठी कापडे आहेत.  त्यामुळे या पुरातून वाचल्याचा आनंद साजरा करावा की सर्वच गमावल्याचा दुखवटा करावा हेच या लोकांना कळत नाही. जगावं की मरावं या विवनचनेत असलेल्या लोकांना  मायबाप सरकारने  आधार द्यावा अशी मागणी पूरग्रस्त  करीत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: more than 18 thousand families are affected due to flood in bhandara