ताडोबातील 200 हून अधिक गाईड्स संपावर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 मे 2017

गाईडसना शासकीय सेवेमध्ये सामावून घेणे, वैयक्तिक विमा संरक्षण, १० हजार रुपये मानधन, कोअर झोनमधे चांगले रस्ते आणि ऑनलाईन बुकिंग कोट्यामधे वाढ या आणि इतर मागण्यांसाठी कालपासून हा संप पुकारला आहे. 

चंद्रपूर - चंद्रपूरच्या ताडोबा व्याघ्र प्रकल्पात वाघ बघण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक मोठ्या संख्येने येतात. एप्रिल आणि मे महिन्यात तर ताडोबा हाऊसफुल असते. पर्यटकांना माहिती देण्याचं काम गाईड करत असतात. मात्र या गाईडस्नी कालपासून संप पुकारला आहे.

आज (रविवार) संपाच्या दुसऱया दिवशी सुद्धा जवळपास 200 हून अधिक गाईड संपावर आहेत. वन प्रशासनाने मात्र या आंदोलनाकडे दुर्लक्ष करत गाईड ऐवजी प्रत्येक जीप्सी सोबत वन कर्मचारी देण्याची व्यवस्था केल्याने संपकरी आक्रमक झालेत.

गाईडसना शासकीय सेवेमध्ये सामावून घेणे, वैयक्तिक विमा संरक्षण, १० हजार रुपये मानधन, कोअर झोनमधे चांगले रस्ते आणि ऑनलाईन बुकिंग कोट्यामधे वाढ या आणि इतर मागण्यांसाठी कालपासून हा संप पुकारला आहे. 

मोहुर्ली, सीताराम पेठ, कोसारा, नांदगाव, झरी, जामणी या आदिवासी पट्ट्यात हे गाईड राहतात. व्याघ्र प्रकल्पातल्या अधिकाऱ्यांद्वारे प्रशिक्षणही त्यांना देण्यात येते. मात्र त्यांना मिळणाऱ्या सवलती मिळत नसल्याने या सगळ्यांनी संप पुकारला आहे. या संपाचा फटका पर्यटकांना बसला आहे. आज हे आंदोलन अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आज पहाटे ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ संपकरी गाईड जबरदस्त घोषणाबाजी करताना दिसत होते.

Web Title: More than 200 Guides on strike in Tadoba