मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडले अन् थेट पोहोचले ठाण्यात...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 मार्च 2020

शहरात नागरिक पहाटे मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडतात. एकत्र जमतात आणि गप्पांचा फड रंगवतात. ही बाब पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या लक्षात आली. या बाबीची गंभीर दखल घेत ऑलआऊट मोहीम राबविण्याचे निर्देश दिले.

यवतमाळ : एकही व्यक्ती घराबाहेर पडू नये, यासाठी प्रशासन आग्रही आहे. तरीही उत्साही लोक मॉर्निगवॉकसाठी घराबाहेर आल्याने त्यांना ताब्यात घेण्यात आले. सोमवारी (ता. ३०) पहाटे यवतमाळ शहरातील विविध भागात पोलिसांनी राबविलेल्या ऑलआऊट मोहिमेत ४५ नागरिकांना ताब्यात घेण्यात आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली.

शहरात नागरिक पहाटे मॉर्निग वॉकसाठी बाहेर पडतात. एकत्र जमतात आणि गप्पांचा फड रंगवतात. ही बाब पोलिस अधीक्षक एम. राजकुमार यांच्या लक्षात आली. या बाबीची गंभीर दखल घेत ऑलआऊट मोहीम राबविण्याचे निर्देश दिले. त्यावरून शहर पोलिस ठाणे,अवधूतवाडी पोलिस ठाणे, लोहार पोलिस ठाण्याच्या पथकाने आज सोमवारी पहाटे गोधणी बायपास, जाम रोड, नागपूर बायपास, लोहारा, एमआयडीसी, पिंपळगाव बायपास, दारव्हा रोड, चौसाळा व इतर परिसरात ऑल आऊट मोहीम राबविली. मॉर्निग वॉकच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्या ४५ नागरिकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन ठाण्यात नेले.

पोलिसांचीऑलआऊट मोहीम
बाहेर फिरणे किती घातक ठरू शकते, हे पटवून दिले. पोलिस ठाण्यातून बाहेर पडल्यानंतर मॉर्निग वॉकविरांचा जीव भांड्यात पडला. या मोहिमेसाठी अपर पोलिस अधीक्षक नुरुल हसन, उपविभागीय पोलिस अधिकारी माधुरी बाविस्कर, एलसीबीचे पोलिस निरीक्षक प्रदीप शिरस्कर यांच्यासह ठाणेदार, पोलिस कर्मचारी पहाटेच रस्त्यावर उतरले होते. 

या शहरातील चक्‍क नऊ डॉक्‍टरांना केले क्वारंटाईन, हे कारण ठरले कारणीभूत..

आता कायदेशीर कारवाई
ऑल आऊट मोहिमेच्या पहिल्या दिवशी केवळ समज देऊन नागरिकांना सोडून देण्यात आले. पहिला दिवस समजुतीचा होता. मात्र, आता पुन्हा कुणी मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेरआल्यास थेट कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. नागरिकांनी घरातच रहावे, यासाठी पोलिस प्रशासन आणखी आक्रमक झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: morning walk in curfew