वर्धा नदीत बुडालेल्या तिघांपैकी दोघांचे मृतदेह मिळाले; एकाचा शोध अजूनही सुरूच 

मनोज कणकम 
Sunday, 22 November 2020

याच प्रवाहात तिघेही वाहत गेले. अनिल गोगुला याला पोहता येत होते. त्याने सगळ्यात लहान असलेल्या सुजल बोरकरचा जीव वाचविला. मात्र, प्रेम गेडाम, प्रचल वानखेडे, पृथ्वी आसुटकर नदीत वाहत गेले.

घुग्घुस (जि. चंद्रपूर):  वर्धा नदीत पोहोण्यासाठी गेलेले तीन मुले बुडाल्याची घटना शनिवारी (ता. 21) सकाळच्या सुमारास उजेडात आली. रविवारी (ता. 22) प्रचल वानखेडे आणि पृथ्वी आसुटकर यांचे मृतदेह आढळून आले. प्रेम गेडाम याचा मृतदेह अद्याप मिळाला नाही. पोलिसांची शोधमोहीम सुरू आहे.

क्लिक करा - ह्रदयद्रावक! चारित्र्यावर संशय; पोटात चार महिन्याचे बाळ असतानाही पूनमने गळफास लावून केली आत्महत्या

अमराई वॉर्डातील पृथ्वीराज आसुटकर, प्रेम गेडाम, प्रचल वानखेडे, अनिल गोगला आणि सुजन वनकर हे वर्गमित्र शनिवारी वर्धा नदीवर पोहोण्यासाठी गेले होते. यापैकी प्रेम गेडाम, प्रचल वानखेडे, पृथ्वी आसुटकर आणि सुजल बोरकर हे नदीत अंघोळीत उतरले. नदी काठावर असलेल्या दगडांवर कपडे ठेऊन प्रचल वानखेडे, पृथ्वी आसुटकर आणि प्रेम गेडाम यांनी नदीच्या मधोमध उडी घेतली. नदीच्या मध्यभागी पाण्याचा प्रवाह होता. 

याच प्रवाहात तिघेही वाहत गेले. अनिल गोगुला याला पोहता येत होते. त्याने सगळ्यात लहान असलेल्या सुजल बोरकरचा जीव वाचविला. मात्र, प्रेम गेडाम, प्रचल वानखेडे, पृथ्वी आसुटकर नदीत वाहत गेले. या घटनेची माहिती अमराई वॉर्डातील कामगार नेते सैय्यद अनवर यांना मिळाली. त्यांनी तातडीने घुग्घुस पोलिसांना याची माहिती मिळाली. लागलीच पोलिस घटनास्थळावर पोहोचले. चिंचोली गावाचे माजी सरपंच जयंता निखाडे यांना पोलिसांना सूचना देत नदीत उतरून मुलांचा शोध घेण्याच्या सूचना केल्या. 

हेही वाचा - हृदयस्पर्शी! मुळ गावी जाण्यासाठी कुटुंबीयांसह निघाला पती; वाटेत पत्नीने सोडली साथ, मुलं अनभिज्ञ

सायंकाळपर्यंत शोधमोहीम सुरू होती. मात्र, तिघांचाही शोध लागला नाही. शेवटी चंद्रपूरहून बचावदल आणि बोट मागविण्यात आली. मात्र, अंधार असल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली. रविवारी सकाळपासूनच शोधमोहीमेला सुरुवात झाली. सकाळी प्रचल वानखेडे, पृथ्वी आसुटकर यांचे मृतदेह चिंचोली घाटाच्या परिसरात आढळून आले. प्रेम गेडाम याचा मृतदेह अद्याप मिळाला नाही. त्याचा शोध सुरू आहे.

संपादन - अथर्व महांकाळ 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mortals of 2 boys found in wardha river one still missing