COVID19 : बाधितांमध्ये तरुण तर मृतांमध्ये वयस्क सर्वाधिक; 50 ते 70 वयोगटातील नागरिकांना अधिक धोका

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 14 May 2020

दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढत असलेली संख्या पाहता त्याचा फैलाव होतोय हे तर नक्कीच. पण कोरोनारुपी शत्रूने आतापर्यंत आपल्यातल्या जवळपास 15 व्यक्तींना काळाच्या उदरात गडप केले आहे.

अकोला : अकोल्यात कोरोना पाझिटिव्ह रुग्ण दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. तर यासोबतच मृत्यूचेही प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे. या परिस्थितीचे वयोगटनिहाय विश्लेषण केले असता कोरोना विषाणू संसर्गाने बाधीत होण्याचे प्रमाण हे 21 ते 30 या वयोगटातील तरुणांचे सर्वाधिक आहे. या वयोगटातील ४१ जण कोरोना बाधीत आहेत. तर मृत्यूचे प्रमाण हे वयस्कात जास्त आहे. एकूण 15 मृतकांपैकी नऊ जण हे 50 ते 70 या वयोगटातील आहेत हे विशेष. त्यातील सर्वांनाच विविध जुन्या व्याधी होत्या.

जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोना बाधितांची वाढत असलेली संख्या पाहता त्याचा फैलाव होतोय हे तर नक्कीच. पण कोरोनारुपी शत्रूने आतापर्यंत आपल्यातल्या जवळपास 15 व्यक्तींना काळाच्या उदरात गडप केले आहे. थोडक्यात ते कोरोना विरुद्धची लढाई हरले. तर आतापर्यंत 60 जण ही लढाई जिंकून यशस्वीरित्या घरी गेले आहेत. कोरोना बाधीत व्यक्तींच्या व कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींच्या आकडेवारीचे विश्लेषण करणे आवश्यक आहे.

आवश्यक वाचा - Video : पालकमंत्री बच्चू कडू यांनी केले चक्क पोलिसांचेच स्टींग ऑपरेशन

सर्वाधिक बाधित क्षेत्र म्हणून बैदपुऱ्याची ओळख
अकोला जिल्ह्यात 13 मेपर्यंत आढळलेले सर्वाधिक रुग्ण हे महानगरपालिका क्षेत्रातील म्हणजे 170 रुग्ण हे मनपा हद्दीच्या भागातील आहेत. अन्य नगरपालिका हद्दीत आठ तर ग्रामीण भागातील तीन जण आहेत. अकोला शहरातील व ग्रामीण भागातील मिळून तब्बल 42 ठिकाणांहून रुग्ण आढळले आहेत. भागनिहाय बाधितांची संख्या पाहिल्यास बैदपुरा या भागात सर्वाधिक म्हणजे 46 रुग्ण आढळले. त्याखालोखाल 11 रुग्ण ताजनगर, मोहम्मद अली रोड 9, मोमीन पुरा 8, न्यू भीमनगर, माळीपुरा आणि पातूर येथील 7, कृषी नगर येथील 6, अकोटफैल येथील 5, सिंधी कॅम्प 4 व अन्य भागात 1 ते 2 रुग्ण आढळून आले आहेत.

हेही वाचा - अबब! शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी लागणार स्टॅम्प, शासन आदेशाविरुद्ध सुरू आहे काम

असे आढळळे वयोगटनिहाय रुग्ण
आतापर्यंत जे रुग्ण पॉझिटिव्ह आढळले त्यांचे वयोगट पाहता आतापर्यंत फक्त सहाजण हे वयवर्ष पाच पेक्षा कमी आहेत. आठ जण दहा वर्ष वयाच्या आतील आहेत. 21 जण 11 ते 20 वर्षे वयोगटातील आहेत. तर सर्वाधिक रुग्ण संख्या असलेला गट हा 21 ते 30 वयोगटातील आहे त्यांची संख्या 41 आहे. वय वर्षे 31 ते 40 या वयोगटात 33 जण आहेत तर 41 ते 50 या वयोगटात 32 जण आहेत. 51 ते 60 या वयोगटात 21 जण असून 60 पेक्षा अधिक 27 जण रुग्ण आहेत.

पुरुषांच्या तुलनेत महिलांचे मृत्यू
आतापर्यंत अकोल्यात उपचार घेतांना मयत झालेल्यांची संख्या 15 झाली आहे. त्यात एक आत्महत्या आहे. त्यामुळे कोविडचे उपचार घेतांना 14 जण मयत झाले आहेत. या 14 जणांपैकी पाच जण हे मृतावस्थेतच रुग्णालयात आणले होते. तर 9 जणांचा मृत्यू हा रुग्णालयात उपचारा दरम्यान झाला आहे. तर मयत झालेल्या व्यक्तिंपैकी १२ व्यक्तींना उच्च रक्तदाब, मधुमेह, श्वसनाचे विकार, हृदयविकार इत्यादी आजार होते. मृतांपैकी सर्व जण हे प्रतिबंधित क्षेत्रातील रहिवासी आहेत. तर वयोगटनिहाय विचार केला असता मयत पावलेल्या 15 जणांपैकी नऊ जण हे 50 ते 70 या वयोगटातील आहेत. केवळ एक जण तीशीच्या आतला होता. अर्थात त्याने आत्महत्या केली होती. उर्वरीत पाच जण हे 70 पेक्षा अधिक वयाचे होते. आणि मयतांपैकी 7 पुरुष आणि आठ महिला असे प्रमाण आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Most of the corona victims are young and most of the dead are adults