विभागीय शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची रणधुमाळी, अमरावती जिल्ह्यात सर्वाधिक मतदार

सुधीर भारती
Wednesday, 4 November 2020

अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत 34 हजार 690 मतदारांची नोंदणी झालेली आहे. अमरावतीत सर्वाधिक 10 हजार 88, त्याखालोखाल यवतमाळ 7 हजार 407, बुलडाणा 7 हजार 422, अकोला 6 हजार तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी 3 हजार 773 मतदार सध्या आहेत.

अमरावती : अमरावती विभागातील शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत सर्वाधिक 10 हजार 88 मतदार अमरावती जिल्ह्यात आहेत. 31 ऑक्‍टोबरपर्यंत 35 हजार मतदारांची नोंद झाली असली तरी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेपर्यंत मतदारनोंदणी चालूच राहणार आहे. त्यामुळे मतदारांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. 

दरम्यान, विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी मंगळवारी (ता. तीन)पत्रकार परिषद घेऊन या निवडणुकीची माहिती दिली. अमरावतीसह अकोला, वाशिम, बुलडाणा व यवतमाळ या पाच जिल्ह्यांत 34 हजार 690 मतदारांची नोंदणी झालेली आहे. अमरावतीत सर्वाधिक 10 हजार 88, त्याखालोखाल यवतमाळ 7 हजार 407, बुलडाणा 7 हजार 422, अकोला 6 हजार तर वाशिम जिल्ह्यात सर्वात कमी 3 हजार 773 मतदार सध्या आहेत. यामध्ये 25 हजार 578 पुरुष, तर 9 हजार 111 स्त्री मतदार आहेत. 12 नोव्हेंबर नामनिर्देशनपत्र दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून 17 नोव्हेंबरपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहेत. मतदानासाठी 77 मतदान केंद्रे राहणार आहेत. तसेच 348 मतदान अधिकारी राहतील, अशी माहिती विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी दिली.  

हेही वाचा झाली मोठी चूक! सुमारे चार हजार शेतकऱ्यांकडून परत घेतली जाणार प्रधानमंत्री किसान सन्मान निधी...

बोगस मतदारांच्या दस्तावेजांची तपासणी -
आतापर्यंत 34 हजार मतदारांची नोंदणी झालेली असून त्यामध्ये बोगस मतदारांची संख्यासुद्धा वाढल्याची संभाव्य उमेदवारांची तक्रार आहे. अशा 10 तक्रारी प्राप्त झालेल्या असून संबंधितांच्या कागदपत्रांची तपासणीचे काम सुरू असल्याचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी सांगितले. काही महाविद्यालयांतील चौकीदारालाही मतदार दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याच्या तक्रारी आहेत. 

पॉझिटिव्ह असल्यास टपाल मतपत्रिका -
विभागीय आयुक्त कार्यालयातच नामनिर्देशनासंबंधी संपूर्ण प्रक्रिया होणार आहे. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर उमेदवारांसह दोघांना कार्यालयात प्रवेश असणार आहे. तसेच दोनच वाहनांना परवानगी देण्यात आलेली आहे. कोरोना पॉझिटिव्ह मतदाराने मागणी केल्यास टपाल मतपत्रिका उपलब्ध करून दिली जाईल. याशिवाय मतदानकेंद्रावर सोशल डिस्टन्सिंग, मास्क, सॅनिटायझरचा वापर अत्यावश्‍यक करण्यात येणार आहे. 

हेही वाचा - प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विजय राजला गोंदियात अटक; सहकारी महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप  

शासकीय गोदामात मतमोजणी -
अमरावतीच्या विलासनगर परिसरातील शासकीय गोदामामध्ये तीन डिसेंबरला मतमोजणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे. त्यासाठी सात टेबल राहणार असल्याचे विभागीय आयुक्त पीयूष सिंह यांनी सांगितले.  
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: most of voters from amravati in teacher constituency election