
काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने शिवारातील शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. ही घटना गावकऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
मारेगाव, (जि. यवतमाळ) : संतापाच्या भरात माणूस मागचा पुढचा कुठलाही विचार करीत नाही. परंतु त्याचे गंभीर परिणाम अनेकांना भोगावे लागतात. समाजमन सुन्न करणारी अशीच एक घटना यवतमाळ जिल्ह्यातील मारेगाव तालुक्यात उघडकीस आली. या घटनेमुळे कुटुंबीयांसह सारेच हादरले असून, नेमके असे काय घडले याचाच सारे शोध घेत आहेत.
तीन वर्षांच्या चिमुकल्यासह मातेने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना तालुक्यातील म्हैसदोडका येथे आज, (ता. नऊ) दुपारी दोनदरम्यान उघडकीस आली. मोनाली लक्ष्मण पारखी (२९) व जय लक्ष्मण पारखी (३) असे त्या मायलेकांची नावे आहेत.
मोनाली दुपारी साडेबारादरम्यान शेतात जातो म्हणून घरच्यांना सांगून गेली होती. मात्र, तिने गावापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या बोधाने यांच्या शेतातील विहिरीत मुलासह उडी घेतली. काहीतरी पडल्याचा आवाज आल्याने शिवारातील शेतकऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. ही घटना गावकऱ्यांना कळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
सदर घटनेची माहिती गावकऱ्यांनी मारेगाव पोलिसांना देताच पोलिस तत्काळ घटनास्थळी पोहोचले. दोघांचेही शव बाहेर काढून मुलासह आईस मारेगाव ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविण्यात आले. वृत्त लिहीपर्यंत मोनालीच्या आत्महत्येचे कारण कळू शकले नाही. पुढील तपास वणीचे उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांचे मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक जगदीश मंडलवार पोलिस उपनिरीक्षक निरक्षक अमोल चौधरी करीत आहेत.
संपादन : अतुल मांगे