Video : तब्बल नऊ महिन्यांनी औरंगाबादहून परतला मुलगा.... आईच म्हणाली घरात येऊ नको...

संदीप रायपुरे
Friday, 15 May 2020

औरंगाबाद जिल्हा हा रेड झोनमध्ये येत असल्यामुळे त्याने गावात आल्याबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क केला. आपल्या कुटुंबाला शाळेत क्वारंटाईन करण्याची मागणी देखील केली. परंतु, ग्रामपंचायतीने यास स्पष्ट नकार दिला. गावात स्व:ताच घर असल्याने नाईलाजाने तो घरी गेला. परंतु, मुलाला व त्याच्या कुटुंबाला बघितल्यानंतर आईने आनंद व्यक्‍त करण्याऐवजी त्यांना घरात घेण्यास नकार दिला.

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : आई... आई म्हणजे मायेचा सागर... ती कुठल्याही परिस्थितीत आपल्या मुलांना स्वत:पासून दूर करीत नाही... वेळप्रसंगी आपला जीव देईल पण मुलांना धक्‍काही लागू देणार नाही... समाजाची कुठलीही परवा न करता ती आपल्या चिल्यापिल्यांसाठी लढत असते... मोलमजुरी करण्यापासून तर दुसऱ्यांच्या घरी धुणीभांडी करण्यापासून ती माघार घेत नाही... म्हणूनच आईला देवाचे स्थान देण्यात आले आहे... मात्र, आईच्या या प्रेमालाही ग्रहण लागले आहे... या ग्रहणाचे नाव आहे कोरोना... कोरोनामुळे चक्‍क आईनेच मुलाला घरात येण्यास मनाई केल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्‍यात घडली... 

गावात काम मिळत नसल्यामुळे प्रफुल्ल मिलमिले (वय 30) याने शहरात जाण्याचा निर्णय घेतला. शहरात काम मिळेल, रोजीरोटी सोई होईल व दोन पैसे घरी आणता येईल या आशेने त्याने पत्नी अश्‍विनी व चिमुकली दीक्षासह औरंगाबाद गाठले. यावेळी वृद्ध आई गावातच होती. साधारणत: नऊ माहिने त्याने औरंगाबादमध्ये काम केले. मात्र, त्याच्या स्वप्नालाही ग्रहण लागले.

जाणून घ्या - सतत प्रियकरासोबत फोनवर बोलत होती पत्नी, पतीने अर्ध्या रात्री केले हे...

कोरोनारूपी राक्षसाने देशात प्रवेश केला. यामुळे लॉकडाउन लावण्याची वेळ सरकारवर आली. इच्छा नसतानाही सरकारला असा निर्णय घ्यावा लागला. यामुळे लोकांचे रोजगा हिरावल्या गेले व कामधंदेही बंद झाले. हाताला काम नाही आणि पोटात अन्न नाही, अशा कठीण काळात किती दिवस दुसरीकडे राहायचं, असा विचार प्रफुल्लच्या मनात घर करीत होता. 

दुसरीकडे औरंगाबाद रेड झोनमध्ये असल्याने जिवाची भीती होती. या दुहेरी संकटाने प्रफुल्ल पुरता ढासळला होता. तिसऱ्या लॉकडाउनच्या काळात सरकारने कामगारांना आपापल्या राज्यात जाण्याची परवानगी दिली. यामुळे घरी जाण्याची इच्छा अधिक वाढली. यामुळे त्याने पदरमोड करून जमविलेले पैसे घेत कुटुंबीयांसह बुधवारी तारसा बुज येथे पोहोचला. 

औरंगाबाद जिल्हा हा रेड झोनमध्ये येत असल्यामुळे त्याने गावात आल्याबरोबर ग्रामपंचायत प्रशासनाशी संपर्क केला. आपल्या कुटुंबाला शाळेत क्वारंटाईन करण्याची मागणी देखील केली. परंतु, ग्रामपंचायतीने यास स्पष्ट नकार दिला. गावात स्व:ताच घर असल्याने नाईलाजाने तो घरी गेला. परंतु, मुलाला व त्याच्या कुटुंबाला बघितल्यानंतर आईने आनंद व्यक्‍त करण्याऐवजी त्यांना घरात घेण्यास नकार दिला.

हेही वाचा - लाॅकडाउनमध्ये प्रेमीयुगूल झाले सैराट, का वाढली पळापळी?...वाचा

ठाणेदाराने दखल घेतल्यानंतर केले क्वारंटाईन

आईनेच नकार दिल्यानंतर मुलगा निस्त:ब्ध झाला. गावातील शाळेच्या बाजूला तो कुटुंबीयांना घेऊन गेला. लहानशी मुलगी व पत्नीसह भर उन्हात अन्नपाण्याविना ते तडफडत होते. दोन भिंतीच्या मधात चादर टाकून त्यान कसबस सावरल. शेवटी गावातील काही कार्यकर्त्यांनी पाण्याची सोय केली. ठाणेदार संदीप धोबे यांना माहिती दिली. यानंतर कुटुंबीयाला शाळेत क्वारंटाईन करण्यात आले. गुरुवारी सकाळ ठाणेदार धोबे यांनी त्यांच्या जेवनासाठी किट्‌स उपलब्ध करून दिली. 

मुलाला होणाऱ्या वेदना बघून फुटले पाझर

औरंगाबादवरून आलेल्या मुलासह त्याच्या कुटुंबाला घरात येण्यास आईने मनाई केली. ग्रामपंचायतीनेही क्‍वारंटाईन न केल्याने शाळेच्या आवारात भरभरत्या उन्हात पाणी व अन्नाविना राहावे लागले. कोरोनाने मायलेकाच्या नात्यातही काही वेळासाठी दुरावा आणला होता. शेवटी ती आईच... मुलाला होणाऱ्या वेदना बघून तिला पाझर फुटले... शेवटी तिने घरी जेवनाचा डब्बा तयार करीत मुलाच्या कुटुंबाला दिला व त्यांच्या रात्रीच्या जेवनाची व्यवस्था केली. 

महत्त्वाची बातमी - ती साडेआठ महिन्यांची गर्भवती, तपासणीसाठी आली अन्‌ आल्यापावली परतली, काय असेल कारण...

आईच्या निर्णयाचे कौतुक

तब्बल नऊ महिन्यानंतर मुलगा कुटुंबासह गावात पतरला. कोरोनामुळे घरी न जाता स्वतला क्‍वारंटाईन करण्याची मागणी केली. मात्र, ग्रामपंचायतीने नकार दिल्याने नाईलाजास्तव घर गाठले. आईनेही मुलगा घरी आल्याचे आनंद बाजूला सारून कोरोनामुळे त्याला घरात येण्यास मनाई केली. काळजाच्या तुकड्याला चक्‍क आईनेच विरोध केल्याने समाजमन सून्न राहील. दुसरीकडे तिच्या या निर्णयाचे कौतुकही होत आहे. मुलाला कोरोनाची लागण झाली असेल तर जिल्ह्याल्याच याचे परिणाम भोगावे लागेल याची जाणीव तिला होती. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The mother forbade the child to come home