ती साडेआठ महिन्यांची गर्भवती, तपासणीसाठी आली अन्‌ आल्यापावली परतली, काय असेल कारण...

pregnant woman went home without examining
pregnant woman went home without examining

नागपूर : जगासह देशात कोरोनाचे रुग्ण दिवसेदिवस वाढतच आहेत. यामुळे नागरिकांमध्ये चांगलीच दहशत निर्माण झाली आहे. प्रत्येकजण दुसऱ्याकडे संशयाच्या नजरेतून पाहत आहे. साध शिंक आली तरी कोरोनाची लागण झाल्याचा अंदाज लावण्यात येतो. यामुळे नागरिकांना दुसऱ्याला आपल्या घरात प्रवेश करण्यास मनाई केली आहे. केवळ संशयाने नागनिकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. असाच एक प्रकार शासकीय वैघकीय महाविद्यालयामध्ये (मेडिकल) गर्भवतीने अनुभवला... 

मेडिकल हे मध्य भारतातील सर्वात मोठे शासकीय रुग्णालय आहे. येथे नेहमीच रुग्णांची गर्दी असते. विदर्भासह छत्तीसगड, मध्यप्रदेश आदी राज्यांतून रुग्ण उपचारासाठी येत असतात. प्रसूतीसाठी येणाऱ्या गर्भवतींची संख्याही मोठी आहे. दोन-अडीच महिन्यांपूर्वी कोरोनाने शहरात दखल दिली. कोरोनाची दहशत इतकी पसरली आहे की इतर आजारांच्या रुग्णांची संख्या रोडावली आहे. जणू दुसरे रोग आहेच नाही, असेच एकंदरीत दिसून येत आहे.

कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी मेडिकलमध्ये कोरोना वॉर्ड तयार करण्यात आले आहे. तसेच येथे प्रसूतीसाठी महिलांची नोंदणी होत आहे. गरिबांना खासगीचा खर्च पेलवत नसल्याने मेडिकलमध्ये प्रसूतीसाठी येतात. कोरोनासारख्या कठीण काळात त्यांना हाकलून देणे म्हणजे मेडिकलची प्रतिमा मलीन करण्याचा प्रकार होय. एकीकडे डॉक्‍टरसह परिचारिका, आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनासोबत लढणारे योद्धे म्हणून गौरविले जाते. दुसरीकडे प्रसूतीसाठी येणाऱ्या मायमाऊलींना बाहेरचा रस्ता दाखवण्यात हेच कर्मचारी पुढे असल्याचे दिसून येते. 

हाकलून दिलेल्या गर्भवतीचे नाव दिव्या असून, तिचा एमआडी क्रमांक 2181557 आहे. ही महिला अखेरच्या महिन्यात तपासणीसाठी आली. मात्र, तिला तपासणी न करता, दाखल करून न घेता थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. टेकडी परिसरात राहणाऱ्या या महिलेची नोंदणी यापूर्वी झाली असल्याचेही सांगण्यात आले. 

महिलेला उपेक्षेची वागणूक

कोरोनामुळे सर्वत्र दहशत पसरली आहे. रुग्ण दिसला की, तो कोरोनाचाच आहे, असा संशय येतो. याचाच अनुभव मेडिकलच्या स्त्री व प्रसूतीरोग विभागातील बाह्यरुग्ण विभागात आला. साडेआठ महिन्यांची गर्भवती माता प्रसूती विभागात उपचारासाठी आली असता तिला चक्क बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचा प्रकार मेडिकलमध्ये घडला. या महिलेला येथे उपेक्षेची वागणूक मिळाल्याने ती आल्यापावली परत गेली.

मानवाधिकार आयोगाकडे करणार तक्रार

केवळ कोरोना रुग्णांसाठी मेडिकल आहे, असे प्रशासनाने एकदाच सांगून टाकावे. मेडिकलमध्ये इतर आजाराच्या रुग्णांनी येऊ नये असे फलक लावून टाकावे, असे सामाजिक कार्यकर्ते मिलिंद डोंगरे यांनी सांगितले. या गर्भवतीच्या जीवाला बरे-वाईट झाल्यास कोण जबाबदार, असा सवाल करीत या प्रकरणाची मानवाधिकार आयोगाकडे तक्रार करणार असल्याचे डोंगरे म्हणाले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com