अत्यंत दुर्दैवी... नेमके रडायचे तरी कुणासाठी, कोरोनाने एकाच वेळी नेले घरातील तीन जीव

कृष्णा लोखंडे
Tuesday, 15 September 2020

जुनी वस्ती बडनेरा येथील रहिवासी असलेल्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्याच्या घरातील ही दुःखदायक घटना आहे. या महिलेच्या पतीच्या नागपूरमध्ये राहणाऱ्या बहिणीचे दोन आठवड्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे तो आई-वडिलांसह नागपूरला गेला होता. या प्रवासात आधी आई-वडील व नंतर मुलगा असे तिघे कोरोना संक्रमित झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.

अमरावती : बहिणीच्या अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या भावासह त्यांच्या आई-वडिलांचा लागोपाठ मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना येथे उजेडात आली. पत्नी व दोन मुलींना अनाथ करून बाप गेला. दुःखाचा पहाड कोसळलेल्या तिघींना नेमके रडायचे तरी कुणाकुणासाठी, असा प्रश्‍न कोरोनाने निर्माण करून ठेवला. विशेष म्हणजे कोविडविरोधात लढण्यात या कुटुंबांचा सहभाग आहे.

जुनी वस्ती बडनेरा येथील रहिवासी असलेल्या महिला स्वच्छता कर्मचाऱ्याच्या घरातील ही दुःखदायक घटना आहे. या महिलेच्या पतीच्या नागपूरमध्ये राहणाऱ्या बहिणीचे दोन आठवड्यांपूर्वी निधन झाले. त्यामुळे तो आई-वडिलांसह नागपूरला गेला होता. या प्रवासात आधी आई-वडील व नंतर मुलगा असे तिघे कोरोना संक्रमित झाले. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र प्रकृती ढासळत गेली व गत सोमवारी (ता. सात) आई-वडिलांचे एकापाठोपाठ काही तासांच्या अंतराने निधन झाले.

जाणून घ्या - प्रसूती शस्त्रक्रियेनंतरही मातेला होत होत्या असह्य वेदना; रुग्णालयात भरती करताच पोटात आढळले..
 

त्यांचे मृतदेह घरी आले नाहीत. त्यांचे अंत्यदर्शन घरातील कुणालाच घेता आले नाही. मुलाला अंत्यसंस्काराला उपस्थिती लावता आली एवढेच. या कुटुंबावरील दुःखाचा अंत येथेच झाला नाही तर आई-वडिलांचे अंत्यसंस्कार आटोपत नाही तोच सोमवारी मुलाचा सुपर स्पेशालिटीतील कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दोन आठवड्यात चार जणांचा मृत्यू झाल्याने कुटुंबातील उर्वरित सदस्यांना जबर हादरा बसला आहे.
 
सासू-सासऱ्यांच्या निधनाचे दुःख ओसरत नाही तोच घरातील कर्ता पुरुष गेला. कालपर्यंत ज्यांचे आवाज घरात होते त्यांचे मृतदेहही घरी येऊ शकले नाहीत. कालपर्यंत ज्यांच्यासोबत आनंदाने राहिलो त्यांचे अंत्यदर्शनही तिघींना घेता आले नाही. रडायचे कुणाकुणासाठी, असा प्रश्‍न त्या महिलेला व त्यांच्या दोन मुलींना पडला. दुःखाचा डोंगर कोसळल्याने भविष्य काय? या प्रश्‍नाचे उत्तर शोधूनही सापडत नसल्याची धक्कादायक स्थिती निर्माण झाली आहे. 

नागपुरातही स्थिती हाताबाहेर

नागपूर जिल्ह्यात कोरोनाबाधितांचा दर दिवसाला उच्चांक आढळून येत असताना सोमवारी चाचण्यांची संख्या खाली घसरली आणि बाधितांचा आकडादेखील हजाराच्या घरात आला. मात्र, लगेच मंगळवारी (ता.१५) नागपूर जिल्ह्यात चाचण्यांची संख्या काहीशी वाढली. दर दिवसाच्या तुलनेत चाचण्यांची संख्या घटली असली तरी कोरोनाबाधितांची संख्या वाढली. सहा हजार ३२१ चाचण्या मंगळवारी झाल्या. यातील १ हजार ९५७ जण कोरोनाबाधित आढळून आले. तर २४ तासांमध्ये ४८ जण कोरोनाचे बळी ठरले. त्यामुळे बाधितांची संख्या ५५ हजार ४३० झाली तर मृत्यूचा आकडा १७५३ वर पोहचला. नागपूर जिल्ह्यात दोन दिवसांपूर्वी एका दिवसात ८ ते १० हजार चाचण्यांची होत असे. परंतु दोन दिवासांपासून चाचण्यांचा वेग मंदावला आहे. पहिल्या दिवशी चार हजार तर दुसऱ्या दिवशी ६ हजार ३२१ चाचण्यांची नोंद झाली. ६ हजार चाचण्यांमध्येही १९५७ जण बाधित आढळले ही नागपुरसाठी धोक्याची घंटा अहे. जिल्ह्यात मंगळवारी १९५७ बाधितांमध्ये नागपूर शहरातील बाधितांची संख्या १७०५ आहे. तर ग्रामीण भागातील २४६ रुग्णांची नोंद झाली.
संपादन : अतुल मांगे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mother-in-law, father-in-law and husband die of corona infection