"आई माझा गुरू, आई कल्पतरू'; असे काय घडले की, लेकीच्या शिक्षणासाठी आई बनली शिक्षिका 

file photo
file photo

यवतमाळ : "आई माझा गुरू, आई कल्पतरू', या कवितेचे महत्त्व पटते ते भूमिकाच्या आईने घेतलेल्या निर्णयाने. तिने अगदी सामान्य मुलीसारखा जन्म घेतला. तिच्या येण्याने घरात आनंदाची पेरणी झाली. मात्र, वैद्यकीय दोषामुळे इवल्याशा परीला कायमचे अंधत्व आले. या काळात खचून न जाता कुटुंबाने भूमिकाच्या आयुष्याला आकार देण्यासाठी बळ दिले. तल्लख बुद्घीमत्तेच्या भूमिकाला शिक्षण घेता यावे, यासाठी आईने दोन वर्षाचा ब्रेललिपीतील डिएड पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. लेकीसाठी आईच शिक्षिका बनल्याने शिक्षणाचा मार्ग सुकर झाला.. 

चुकीच्या उपचारामुळे आले अंधत्व 
रोशनी व सुजित राय यांच्या संसारवेलीवर उमललेले भूमिका हे गोड फळ आहे. नगरसेवक सुजित राय यांच्या मुलीवर जन्मानंतर डॉक्‍टरांनी केलेल्या चुकीच्या उपचारामुळे अंधत्व आले. तिच्यावर उपचार करण्यासाठी दाम्पत्याने चेन्नई, हैदराबाद, जालना, मुंबई येथील प्रसिद्घ दवाखाने पालथे घातले. त्यात त्यांना यश आले नाही. लहानपणापासून तिच्या तल्लख बुद्घीमत्तेची भूरळ अनेकांना पडली. लेकीने शिक्षण घेऊन मोठे व्हावे, हे स्वप्न राय दाम्पत्याने बघितले. मात्र, यवतमाळात दृष्टीहिन मुलांसाठी विशेष शाळा नसल्याने अडचण उभी ठाकली. लहानशा भूमिकाला नागपूर येथे एकटीला कसे सोडायचे, ही चिंता पालकांना सतावू लागली. मग आईनेच ब्रेललिपित शिक्षण घेतल्यास कसे राहिल, असा विचार बोलून दाखविला. सुजित राय यांनी कोणताही विचार न करता तत्काळ होकार दिला. ब्रेललिपीसाठी आवश्‍यक असलेली पूर्व परीक्षा रोशनी यांनी उत्तीर्ण केली. तीन वर्षाचा मुलगा वडिलांकडे तर, भूमिका आईसोबत नागपूरला राहिली.  हिंगणा येथील ज्ञानज्योती अंध निवासी विद्यालयात लेकीचा प्रवेश निश्‍चित केला. डेहरादून विद्यापीठाच्या राष्ट्रीय दृष्टिहिन प्रशिक्षण संस्थेतून विशेष शिक्षण पदविका मिळविली. विशेष म्हणजे लग्नाच्या दहा वर्षानंतर रोशनी राय यांनी महाविद्यालयाची पायरी चढली. टिईटी परीक्षादेखील पास केली आहे. आपल्या मुलाने सामान्यांप्रमाणे जीवन जगावे, असे प्रत्येक पालकाला वाटते. काही अडचणींना कवटाळून बसतात. काही पालक मार्ग काढतात. राय कुटुंब हे आदर्श ठरले आहे. 


भूमिका लहान पानापासून अभ्यासात हुशार आहे. तिच्या शिक्षणाचा विचार मनात आला. यवतमाळ येथे विशेष शाळा नसल्याने नागपूर येथे शिक्षण देणे हाच एकमेव पर्याय दिसला. भूमिकाला तिला अभ्यासासोबत नृत्य, संगीत, गीत आणि खेळाची आवड आहे. शाळेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होते. इंग्रजी भाषेत भाषण देते. 
- रोशनी सुजित राय,भूमिकाची आई, यवतमाळ. 

भूमिकाला व्हायचय जिल्हाधिकारी 
भूमिका ही आता चौथ्यावर्गात शिक्षण घेत आहे. अभ्यास करण्यासोबत खेळायला आवडते. प्रांजली पाटील यांच्याप्रमाणे जिल्हाधिकारी व्हायचे आहे. विशेष म्हणजे तत्कालीन जिल्हाधिकारी सचिंद्रप्रताप सिंह यांच्या कार्यकाळात शिक्षणाच्या वारीचे उद्‌घाटन भूमिकाच्या हस्ते करण्यात आले होते. 

-संपादन :  चंद्रशेखर महाजन 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com