'स्ट्रीट लॉइट'चा महावितरणला 'शॉक', पालिकेसह नगरपंचायतींकडे ४२१ कोटी थकीत

चेतन देशमुख
Tuesday, 15 December 2020

जिल्ह्यातील दहा नगरपालिका व सहा नगरपंचायतींच्या हद्दीत तब्बल दोन हजार 676 स्ट्रीट लाइट बसविण्यात आलेले आहेत. त्यात मोठ-मोठ्या हायमास्ट लाईटचाही समावेश आहे. अनेक शहरांतील महत्त्वाच्या चौकात हायमास्ट लावण्यात आलेले आहेत.

यवतमाळ : जिल्ह्यातील दहा नगरपालिका व सहा नगरपंचायतींच्या हद्दीमधील दोन हजार 676 स्ट्रीट लाईटचे तब्बल 412 कोटी 78 लाख रुपये विजबिलाचे थकीत आहेत. या थकीत रकमेमुळे महावितरणचे टेन्शन वाढले आहे. त्यामुळे आता महावितरण काय कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा - शिरजगाव मोझरी-अमरावती एसटी फेऱ्या सुरू; पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी घेतला पुढाकार

जिल्ह्यातील दहा नगरपालिका व सहा नगरपंचायतींच्या हद्दीत तब्बल दोन हजार 676 स्ट्रीट लाइट बसविण्यात आलेले आहेत. त्यात मोठ-मोठ्या हायमास्ट लाईटचाही समावेश आहे. अनेक शहरांतील महत्त्वाच्या चौकात हायमास्ट लावण्यात आलेले आहेत. नागरिकांना रात्री प्रकाश मिळावा व शहराच्या सौंदर्यात अधिक भर पडावी, असा दुहरी उद्देश आहे. परंतु, यासाठी महिन्याकाठी लाखो रुपयांचे वीजबिल द्यावे लागते. हे वीजबिल नगरपालिका व नगरपंचायत प्रशासनाला नियमित भरावे लागते. यासाठी ग्राहकांकडून करवसुली योग्यरीत्या होणे अपेक्षित राहते. मात्र, नियमित करवसुली असतानाही स्ट्रीट लाईटच्या विजबिलाचे देयके भरताना नगरपालिका व नगरपंचायतींचा हात आखडता आहे. थकबाकीची रक्कम दिवसेंदिवस वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील दोन हजार 676 स्ट्रीट लाईटचे तब्बल 412 कोटी 78 लाख रुपयांचे वीजबिल थकीत आहे. गेल्या काही वर्षांतील ही थकबाकी आहे. वीजबिलाचा भरणा करण्याच्यादृष्टीने महावितरण प्रशासनाकडून वारंवार आवाहन करण्यात येते. या आवाहनाला नगरपालिका व नगरपंचायत प्रशासन प्रतिसाद देत नाही. परिणामी, थकीत वीजबिलाचा आकडा कमालीचा वाढलेला आहे. 

हेही वाचा - काँग्रेस अन् राष्ट्रवादीच्या मैत्रीमध्ये फूट पडतेय का?

विशेष म्हणजे नगरपालिका, नगरपंचायत हद्दीमधील स्ट्रीट लाईटचा वीजपुरवठासुद्धा खंडित करता येत नाही. वीजपुरवठा खंडित केल्यास सर्वसामान्यांच्या रोषाला महावितरणाला सामोरे जावे लागते. त्यात पांढरकवडा विभागातील नगरपालिका, नगरपंचायतींच्या हद्दीतील स्ट्रीट लाईटचे 738 ग्राहक असून, 147 कोटी 25 लाख रुपये थकीत आहेत. याशिवाय पुसद विभागात 832 ग्राहक आहेत. त्याचे तब्बल साडेदहा लाख रुपये, तर यवतमाळ विभागातील एक हजार 106 स्ट्रीट लाईटचे 119 कोटी 43 लाख असे मिळून 412 कोटी 78 लाख रुपये थकबाकी आहेत. ही थकबाकी करण्याच्यादृष्टीने महावितरणने नगरपालिका, नगरपंचायत प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. मात्र, जिल्ह्यातील सर्वच नगरपालिका व नगरपंचायत प्रशासन या पत्रव्यवहाराला केराची टोपली दाखवितात. वाढलेल्या थकबाकीमुळे आता महावितरणाला कडक पावले उचलण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला नाही.

हेही वाचा - रुग्णाला वृक्षाखाली झोपवून सापाचे विष उतरवून दाखवा अन् २१ लाख मिळवा; अंनिसचे आव्हान

सार्वजनिक विभागांकडेही थकबाकी -
जिल्ह्यातील दहा नगरपालिका व सहा नगरपंचायतींच्या हद्दीमधील सार्वजनिक विभागाने (पब्लिक सर्व्हिसेस) महावितरणला जेरीस आणले आहे. नगरपालिका व नगरपंचायतीने गिरविलेला कित्ता सार्वजनिक विभागदेखील गिरवीत ओह. सार्वजनिक विभागाचे तीन हजार 378 वीजजोडण्या आहेत. त्याचे तब्बल तीन कोटी 27 लाख 52 हजार रुपयांचे वीजबिल थकीत आहे. त्यात पांढरकवडा 151 ग्राहक असून, 80 लाख 36 हजार, पुसद विभागातील एक हजार 199 ग्राहकांकडे एक कोटी 22 लाख, तर यवतमाळ विभागातील एक हजार 328 ग्राहकांकडे एक कोटी 25 लाख रुपये वीजबिल थकले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MSEB arrears of 421 crore pending to corporations in yavatmal