काँग्रेस अन् राष्ट्रवादीच्या मैत्रीमध्ये फूट पडतेय का?

things which may affect friendship between congress and ncp
things which may affect friendship between congress and ncp

नागपूर : अनेक वर्षांपासून काँग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी आहे. मात्र, गेल्या काही दिवसांमधील घडामोडी पाहता या दोन्ही पक्षांमध्ये सर्वकाही आलबेल आहे का? असा प्रश्न विचारला जात आहे. काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधींबाबत एक वक्तव्य केले होते. त्यावर काँग्रेसच्या नेत्यांनी आक्षेप नोंदविला होता. त्यातच शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष होणार, अशा चर्चा रंगल्या होत्या. त्यावरूनही काँग्रेस नेत्यांमध्ये धुसफूस रंगलेली पाहायला मिळाली. हे सर्व होत नाहीतर खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या पंतप्रधान पदावरून काँग्रेसवर थेट आरोप केले आहेत. या सर्व घडामोडी बघता काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या मैत्रीमध्ये फूट पडतेय का, त्यांचे संबंध ताणले जात आहेत का? अशा चर्चा रंगल्या आहेत.  

शरद पवार यांनी गेल्या ४ डिसेंबरला एका वृत्रपत्राला दिलेल्या मुलाखतीत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधींबाबत मोठे वक्तव्य केले होते. राहुल गांधी यांच्यामध्ये एका राष्ट्रीय नेत्याच्या स्वरुपात काही प्रमाणात सातत्याची कमतरता दिसून येत असून पक्षामध्ये त्यांची स्वीकार्हता आहे का? हे पाहावे लागेल, असे पवार त्यावेळी म्हणाले होते. त्यावरून काँग्रेस नेते चांगलेच नाराज झाले होते. काँग्रेसच्या नेत्या आणि महाविकास आघाडीतील मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यांची नाराजी उघडपणे ट्विटरवर बोलून दाखविली होती. 'आघाडीमधील काही नेत्यांच्या काही मुलाखती/लेख माझ्या निदर्शनास आलेयत. काँग्रेसची कार्याध्यक्षा म्हणून मला आघाडीतील मित्रपक्षांना सांगू इच्छिते की हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीका-टीप्पणी करणे टाळावं. आघाडी धर्माचं पालन सर्वांनी करावं.' असं ट्विट करत त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या नेत्यांना थेट इशाराच दिला होता.

दरम्यान, बाळासाहेब थोरात यांनी देखील 'राहुल गांधी यांना काँग्रेस पक्षात स्वीकार्हता आहे, ते आमचे नेते असून त्यांच्या नेतृत्वाखाली देशात काँग्रेस पुन्हा संघटित होते आहे. राहुल गांधी काँग्रेस पक्षाची पुढील वाटचाल यशस्वी करणार आहेत यावर आमचा विश्वास आहे. शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. त्यांचा आम्ही आदर करतो. मात्र, ते राहुल गांधींना समजून घेताना कुठंतरी कमी पडले,' असे ट्विट करत त्यांनीही नाराजी बोलून दाखविली होती.

गेल्या आठवड्यात शरद पवार हे युपीएचे अध्यक्ष होणार अशाही चर्चा रंगल्या होत्या. त्यावेळी महाविकास आघाडीतील घटकपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी शरद पवार युपीएचे अध्यक्ष झाले तर आम्हाला आनंदच आहे, असे वक्तव्य केले होते. मात्र, काँग्रेस नेते परत नाराज झाल्याचे दिसून आले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी शरद पवारांनी खुद्द ही बातमी खोटी असल्याचे स्पष्टीकरण दिले होते. त्यानंतर काँग्रेस नेते शांत झाल्याचे पाहायला मिळाले. 

हा वाद मिटत नाहीतर, प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवारांच्या ८० व्या वाढदिवशी एका वृत्तपत्रामध्ये लेख लिहिला. त्यामध्ये शरद पवारांचे पंतप्रधानपद काँग्रेसमुळे हुकल्याचा थेट आरोप पटेलांनी केला आहे. ते म्हणाले 'राजीव गांधींच्या मृत्यूनंतर झालेल्या निवडणुकांमध्ये काँग्रेस बहुमताजवळ असताना पंतप्रधानपदी शरद पवार यांना निवडले जावे, असा एक मतप्रवाह होता. मात्र, 'दिल्ली दरबारी' पवारांना रोखण्यासाठी अनेक कट कारस्थाने सुरू होती. निवडणुकांच्या आधी पवार नको म्हणून नरसिंह राव यांना पवार यांच्या विरोधात अध्यक्षपदी बसविण्यात आले. निवडणुकांनंतरही सोनिया गांधी यांच्या नावाचा वापर, गैरवापर करून पंतप्रधानपदीही नरसिंह राव यांनाच काँग्रेसने पसंती दिली आणि त्यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण हे महत्वाचे खाते देऊन पवारांनी देऊन त्यांना पंतप्रधानपदापासून दूर ठेवण्यात आले. त्यांचे पंतप्रधानपद कसे आणि कोणामुळे दूर गेले हे मी पाहिले आहे', असे आरोप प्रफुल्ल पटेलांनी केले आहेत.

४ डिसेंबर ते १२ डिसेंबर या आठ दिवसांच्या कालावधीत घडलेल्या या घडामोडी आणि दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी केलेल्या वक्तव्यावरून यांच्यामधील संबंध खरंच ताणले जात आहेत का? असा प्रश्न सध्या विचारला जात आहे.

संकलन व संपादन - भाग्यश्री राऊत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com