'व्हीव्हीपॅट'च्या चिट्ठ्यांद्वारेही मतमोजणी - सहारिया

सकाळ न्यूज नेटवर्क
गुरुवार, 5 ऑक्टोबर 2017

मुंबई - नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी येत्या 11 ऑक्‍टोबर रोजी होणाऱ्या मतदानाकरिता एका प्रभागात प्रायोगिक तत्त्वावर "व्हीव्हीपॅट'चा (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट ट्रेल) वापर करण्यात येणार आहे; तसेच या प्रभागात नेहमीच्या मतदान यंत्राबरोबरच "व्हीव्हीपॅट'च्या चिट्ठ्यांद्वारेदेखील मतमोजणी केली जाईल, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी बुधवारी येथे पत्रकार परिषदेत दिली. स्थानिक निवडणुकीत ही प्रणाली वापरणारे महाराष्ट्र हे देशात पहिले राज्य असल्याचा दावाही सहारिया यांनी या वेळी केला

सहारिया म्हणाले, 'नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या एकूण 20 पैकी चार सदस्य संख्या असलेल्या 19 प्रभागांतून सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक 2 मध्ये "व्हीव्हीपॅट'चा वापर होणार आहे. या प्रभागाच्या सर्व 37 मतदान केंद्रांवर "व्हीव्हीपॅट'चा प्रायोगिक तत्त्वावर वापर केला जाईल. हा वापर प्रायोगिक व प्रथमच असल्यामुळे या प्रभागातील मतमोजणी नेहमीच्या मतदान यंत्रासह "व्हीव्हीपॅट'च्या चिट्ठ्यांद्वारेदेखील केली जाणार आहे.''

केंद्रीय निवडणूक आयोगाने लोकसभा व विधानसभा निवडणुकांसाठी टप्प्याटप्प्याने "व्हीव्हीपॅट'चा वापर करण्यास सुरवात करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने ऑक्‍टोबर 2013 मध्ये दिला. त्यानुसार नांदेड- वाघाळा महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत या यंत्राचा वापर करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाने 400 "व्हीव्हीपॅट' यंत्रे खरेदी तत्त्वावर उपलब्ध करून देण्याबाबत इलेक्‍ट्रॉनिक्‍स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या कंपनीला कळविले होते. याच्या वापरासंदर्भात महानगरपालिका आयुक्तांनी मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची व इतर मान्यवरांची बैठक घेतली होती. या बैठकीतच सर्वांच्या उपस्थितीत सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक 2 ची निवड करण्यात आली.

Web Title: mumbai maharashtra news vote counting by vvpat