विजयाने माजत नाही, पराभवाला लाजत नाही- मुनगंटीवार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 21 एप्रिल 2017

चंद्रपूरमध्ये भाजपने ३९ जागा जिंकून सत्ता मिळवली आहे. काँग्रेस १२, शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस २, मनसे 1, अपक्ष एका जागेवर विजयी झाले आहेत.

चंद्रपूर : 'महानगरपालिकेच्‍या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा झालेला विजय ईश्‍वराचा अंश असलेल्‍या जनतेचा विजय असून या विजयाच्‍या मुळाशी कार्यकर्त्‍यांचे परिश्रम आहेत. विजय झाला तर माजायचे नाही व पराभव झाला तर लाजायचे नाही या सूत्रानुसार आम्‍ही या क्षेत्रात कार्यरत आहोत,' असे प्रतिपादन वित्‍त व वनमंत्री तथा चंद्रपूर जिल्‍ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. 

चंद्रपूर शहरात भारतीय जनता पक्षाच्‍या माध्‍यमातून करण्‍यात आलेल्‍या अभूतपूर्व विकासकामांचा हा विजय आहे चंद्रपूरमध्ये भाजपने ३९ जागा जिंकून सत्ता मिळवली आहे. काँग्रेस १२, शिवसेना २, राष्ट्रवादी काँग्रेस २, मनसे 1, अपक्ष एका जागेवर विजयी झाले आहेत. हा विजय आपण नम्रतेने स्वीकारात असून यापुढील काळात चंद्रपूर शहर राज्‍यातील प्रथम क्रमांकाचे शहर म्‍हणून विकसित करण्‍याचा संकल्‍प करीत असल्‍याचे मुनगंटीवार यांनी सांगितले. शहरातील मतदारांचे त्‍यांनी आभार मानले.

ते म्हणाले, "चंद्रपूर महानगरपालिकेची निवडणूक भाजपने विकासाच्‍या मुददयावर लढविली. मतदारांसमोर आम्‍ही केलेली विकासकामे ठेवून निवडणूक लढवली. नागरिकांनी भाजपला मतरूपी आशीर्वाद देत विकासाच्‍या बाजूने कौल दिला. मतदारांच्‍या प्रेमाला आणि विश्‍वासाला आम्‍ही कधीही उतराई होणार नाही. विजय झाला तर माजायचे नाही व पराभव झाला तर लाजायचे नाही या सूत्रानुसार आम्‍ही या क्षेत्रात कार्यरत आहोत. 

शहरातील विकासकामांचा हा झंझावात आपण यापुढेही असाच पुढे नेणार असून मतदारांनी दाखविलेल्‍या विश्‍वासाला आपण कधीही तडा जाऊ देणार नाही, असेही वित्‍तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी म्‍हटले आहे.
 

Web Title: mungantiwar claims voters chose bjp for development