मनपातील कंत्राटदाराला ‘हार्ट अटॅक’

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

नागपूर - कामाची बिले न मिळाल्याने तसेच सिमेंट, गिट्टी दुकानदारांनी पैशाचा तगादा लावल्याने आलेल्या नैराश्‍यातून किशोर नायडू या कंत्राटदाराला हृदयविकाराचा धक्का आला. त्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्या पत्नीने उपचारासाठी पैसे नसल्याने आयुक्तांना थकीत बिल देण्याची विनवणी पत्रातून केली. या घटनेने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली असून एखाद्याचा बळी गेल्यानंतरच  मनपा पैसा देणार काय? असा सवाल कंत्राटदार करीत आहेत. 

कंत्राटदारांची एकूण साडेतीनशे कोटींची देणी असूनही महापालिका प्रशासन हातावर हात ठेऊन बसले आहेत. गेल्या अनेक दिवसांत कंत्राटदारांनी निवेदन दिले, आंदोलन केली. परंतु, महापालिका प्रशासनावर त्याचा काहीही परिणाम झाला नाही. पुढील महिन्यात दिवाळी असून सिमेंट, वाळू, गिट्टी, लोखंड आदी व्यापाऱ्यांनी आता कंत्राटदारांकडे पैशासाठी तगादा लावला आहे.

त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून कंत्राटदारांनी महापालिकेत देयकांसाठी आंदोलन सुरू केले. यामुळे आलेल्या नैराश्‍यातून किशोर नायडू यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यांना बर्डीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे त्यांच्या उपचारासाठीही कुटुंबीयांकडे पैसे नसल्याचे समजते. त्यांच्या पत्नी लता नायडू यांनी संताप व्यक्त करीत महापालिकेचे प्रभारी आयुक्त रवींद्र ठाकरे यांना पत्र लिहून निदान उपचारासाठी तरी पैसे द्या, अशी विनवणी केली आहे. वित्त विभागाकडे असलेली देयके मंजूर करीत पैसे द्यावे, असेही पत्रात त्यांनी नमूद केले आहे. याशिवाय चंद्रशेखर जुनघरे या कंत्राटदाराला सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने नोटीस पाठवून टर्नओव्हरनुसार खात्यात रक्कम नसल्याने खाते बुडीत करण्यासंदर्भात नोटीस बजावली. पालिकेने धृतराष्ट्राची भूमिका घेतल्याने संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, आज सहाव्या दिवशीही कंत्राटदारांनी आयुक्त कार्यालयापुढे आंदोलन केले.

कारवाईची धमकी 
गेल्या आठ महिन्यांपासून कंत्राटदारांची बिले रोखून धरणाऱ्या महापालिकेने त्यांच्यावरच कारवाईची धमकी दिली आहे. पालिका परिसरात सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय आंदोलन करू नये, अन्यथा आपणाविरोधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशा पत्र अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांनी नागपूर महानगरपालिका कंत्राटदार वेलफेअर असोसिएशनला दिले आहे.

Web Title: Municipal Contractor Death by heart Attack