मुलीची हत्या, पित्याला जन्मठेप 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 25 एप्रिल 2017

नागपूर - स्वत:च्या कशिश या सात वर्षीय मुलीला गॅलरीतून रस्त्यावर फेकून खून करणाऱ्या पित्याला सोमवारी (ता. 24) जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीचे नाव प्रदीप पुंडलिकराव जयपूरकर (वय 48, रा. नवाबपुरा) असे आहे. 

नागपूर - स्वत:च्या कशिश या सात वर्षीय मुलीला गॅलरीतून रस्त्यावर फेकून खून करणाऱ्या पित्याला सोमवारी (ता. 24) जिल्हा व सत्र न्यायाधीश शेखर मुनघाटे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. आरोपीचे नाव प्रदीप पुंडलिकराव जयपूरकर (वय 48, रा. नवाबपुरा) असे आहे. 

प्रदीप आणि वर्षा (वय 39, रा. नवाबपुरा) यांचे काही वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना अंकुश (वय 17) आणि कशिश (वय 7) अशी दोन मुले होती. प्रदीप हा काहीच कामधंदा करत नव्हता. वर्षा ही तिचे भाऊ राजेंद्र चरडे यांच्या अयाचित मंदिर मार्गाजवळील घरीच डेली नीड्‌सचे दुकान चालवायची. लग्नानंतर प्रदीप नेहमी पत्नीच्या चारित्र्यावर संशय घ्यायचा. वर्षा आणि मुलगा अंकुश दोघे मिळून दुकान चालवायचे. दुकानात येणाऱ्या पुरुष ग्राहकांशी वर्षाचे अनैतिक संबंध असल्याचा आरोप करून नेहमी मारहाण करीत असे. अनैतिक संबंधातूनच कशिशचा जन्म झाल्याचे प्रदीपचे म्हणणे होते. प्रदीपकडून सतत होणाऱ्या आरोपांबाबत वर्षाने तिच्या भावालादेखील सांगितले होते. वर्षा 10 एप्रिल 2013 रोजी दुपारी 2.30 वाजतादरम्यान सोन्याचे दागिने गहाण ठेवण्यासाठी एसकेएस संस्थेत गेली होती. याबाबत तिने लहान भाऊ रवींद्र चरडे याला कळविले होते. सायंकाळी 6 वाजता ती परत आल्यानंतर प्रदीपने तिच्या चारित्र्यावर संशय व्यक्त करणारे वक्तव्य केले. तसेच मुलीलादेखील धंद्याला लावणार का, असे विचारत शिवीगाळ केली. यानंतर त्याने कशिशलादेखील आईसोबत कुठे गेली होती, याबाबत सविस्तर विचारणा केली. काही वेळाने प्रदीप कशिशला घेऊन साळ्याच्या घरी गेला. तिथे पहिल्या माळ्यावर नेऊन गॅलरीतून कशिशला फेकले. ती खाली उभ्या असलेल्या गाडीवर आदळली. या वेळी घरी उपस्थित असलेले वर्षाचे भाऊ रवींद्र यांनी इतरांच्या मदतीने कशिशला रहाटे हॉस्पिटलला भरती केले. तिथे कशिशचा उपचारादरम्यान दुसऱ्या दिवशी मृत्यू झाला. या प्रकरणी रवींद्र चरडेंनी केलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदविला. 

मनोरुग्ण नसल्याचे सिद्ध 
प्रदीप हा मनोरुग्ण आहे. त्याला येणाऱ्या वेडेपणाच्या झटक्‍यातून मुलीला खाली फेकण्याचा प्रकार घडल्याचे बचाव पक्षाने न्यायालयाला सांगितले होते. मात्र, वैद्यकीय अहवालामध्ये प्रदीप मनोरुग्ण नसल्याचे सिद्ध झाले. या प्रकरणी मुलीला अत्यंत निर्घृणपणे फेकून देणाऱ्या प्रदीपवर हत्येचा आरोप सिद्ध होऊन न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकारतर्फे सरकारी वकील प्रशांत भांडेकर यांनी बाजू मांडली. 

Web Title: murder of the girl