खून करून तरुणीचा चेहरा केला विद्रूप

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

मृताची ओळख पटू नये यासाठी चेहरा दगडाने ठेचून व चाकूचे वार करून विद्रुप करण्यात आला होता. यासोबतच तिचा एक पंजाही गायब होता. तरुणीच्या दुसऱ्या हातावर ‘आशू’ असा ‘टॅटू’ आहे.  तिच्या हातावर आणखी एक ‘टॅटू’ आढळला.

केळवद/सावनेर -  तीक्ष्ण हत्याराने गळा चिरल्यानंतर डोके दगडाने ठेचून चेहरा विद्रूप करण्यात आलेल्या तरुणीचा मृतदेह केळवद पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सावळी (मोहतकर) येथील शिवारात आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ओळख पटू नये म्हणून या तरुणीचा संपूर्ण चेहरा विद्रूप करण्यात आला होता. तसेच या तरुणीच्या एका हाताचा पंजा गायब आहे.

या तरुणीची ओळख पटली असून तिचे नाव खुशी परिहार (वय १९, रा. डिगडोह, हिंगणा) असल्याचे पोलिसांनी सांगितले. केळवद पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नागपूर-बैतूल मार्गावरील सावळी मोहतकर जोडरस्त्यानजीक खोलगट भागात तरुणीचा मृतदेह गावकऱ्यांना शनिवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आढळून आला. फोनवरून मिळालेल्या सूचनेवरून पोलिसांनी घटनास्थळ गाठले. मृताची ओळख पटू नये यासाठी चेहरा दगडाने ठेचून व चाकूचे वार करून विद्रुप करण्यात आला होता. यासोबतच तिचा एक पंजाही गायब होता. तरुणीच्या दुसऱ्या हातावर ‘आशू’ असा ‘टॅटू’ आहे.  तिच्या हातावर आणखी एक ‘टॅटू’ आढळला. याशिवाय गळ्याखालील भागात ‘क्वीन’ असाही ‘टॅटू’ आहे. तरुणीचा गळा चाकूने कापून खून करण्यात आल्यानंतर तिचा चेहरा विद्रुप करण्यात आला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. तिच्या शरीरावर अन्य ठिकाणी चाकूचे घाव आढळून आले आहेत. काळे टी शर्ट, जिन्स हाफ पॅंट व लॉग शूज तिने परिधान केले होते. 

पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला आहे. घटनास्थळावरील परिस्थितीनुसार, तरुणीचा इतरत्र खून करून तिचा मृतदेह येथे फेकून दिला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. केळवद पोलिस घटनेचा तपास करीत आहेत. 

एकास घेतले ताब्यात 
फेसबुक अकाउंटच्या माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखा व केळवद पोलिसांनी या खून प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने अश्रफ शेख (वय २१, रा. जाफरनगर, नागपूर) या तरुणाला ताब्यात घेतले आहे.

लिव्ह इन रिलेशनशिप...
खुशी ही अश्रफ शेख या युवकासोबत गिट्टीखदान परिसरात ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत असल्याची माहिती समोर आली आहे. खुशी व अश्रफ हे दोघेही त्यांच्या आई-वडिलांपासून वेगळे राहत होते. खुशीसोबत लग्न करण्याची इच्छा अशरफने बोलून दाखविली होती. मात्र, अश्रफ याच्या कुटुंबीयांची माहिती मिळताच तिने लग्नास नकार दिला होता. तिचे दुसऱ्यासोबत ‘अफेयर’ असल्याचा अशरफला संशय होता. त्यामुळे त्यांच्यात वाद सुरू झाले होते. शुक्रवारी रात्री अश्रफ तिच्यासोबत सावळी मोहतकर शिवारात आला होता. येथे त्याने त्याच्या एका मित्राला बोलावून घेतले. मात्र, अशरफचा हेतू काही औरच असल्याचे लक्षात येताच तो परत आला. घटनास्थळी अश्रफचा मोबाईल सापडल्याने त्यावरील अखेरच्या कॉलची माहिती काढल्यानंतर हे प्रकरण समोर आले. पोलिसांनी खुर्सापार महसूल नाक्‍यावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात अश्रफची कार व त्याच्या मित्राच्या कारची ओळख पटविली. अश्रफ व त्याचे कुटुंबीय सर्व प्रकाराला नकार देत होते. मित्राने दिलेल्या बयाणाचा पुरावा दिल्यावर घटनेची कबुली दिली. या प्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी अनेकांचे बयाण घेतल्याचेही समोर आले आहे. खुशीचा खून केल्यावर तिचे केस पकडून किमान १५ फुटांपर्यंत ओढत नेल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. घटनास्थळावरील रक्ताचे डाग आणि तिचे केस तसेच घटनास्थळी एक फूट लांब वेणी आढळून आली. 

ओळख पटली
या तरुणीची ओळख पटविण्यासाठी केळवद पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेची मदत घेतली आहे. त्यासाठी फेसबुकचा आधार घेतला. यात तिचे नाव खुशी परिहार असल्याचे स्पष्ट झाले. खुशी नागपुरातील रायसोनी कॉलेजची विद्यार्थिनी असल्याचे फेसबुकवर नमूद आहे. 

घरच्यांशी संपर्क नव्हता
खुशीचे आईवडील मालती (वय ४५) व जगदीश परिहार (वय ५०) डिगडोह येथे रडके ले-आउट परिसरात भाड्याने राहतात. मोलमजुरी करून त्यांचा उदरनिर्वाह चालतो. मागील अनेक दिवसांपासून तिचा घरच्यांशी काहीच संपर्क नव्हता. ती आईवडिलांचे फोनही उचलत नव्हती. नागपुरातील एका होस्टेलमध्ये राहते आणि मॉडेलिंग करते असे तिने घरच्यांना सांगितले होते. तिला महागड्या वस्तू, चैनीचे व्यसन लागले होते, असे तिच्या पालकांनी सांगितले. तिचा खून झाल्याचीही त्यांना माहिती नव्हती. पोलिसांनी विचारपूस केल्यानंतर खुशीचा खून झाल्याचे  कळले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: murder in nagpur