चोरट्यांकडून साथीदाराची हत्या

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

नागपूर : मंदिरातील दानपेट्या चोरणाऱ्या टोळीतील सदस्यांनी मिळून एका साथीदाराची दोराने गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मानेवाडा रिंग रोड, साउथ पॉइंट शाळेमागे, गायत्रीनगरातील मोकळ्या जागेत फेकून दिला. शुक्रवारी सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत सात आरोपींचा समावेश असून एकाला अटक करण्यात आली आहे.

नागपूर : मंदिरातील दानपेट्या चोरणाऱ्या टोळीतील सदस्यांनी मिळून एका साथीदाराची दोराने गळा आवळून हत्या केली. पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मानेवाडा रिंग रोड, साउथ पॉइंट शाळेमागे, गायत्रीनगरातील मोकळ्या जागेत फेकून दिला. शुक्रवारी सकाळी घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेत सात आरोपींचा समावेश असून एकाला अटक करण्यात आली आहे.
साहिल तांबे (17) रा. नाईकनगर, मानेवाडा रिंग रोड असे मृताचे नाव आहे. सुमित पिंगळे रा. चंद्रनगर, शुभम फुलझेले रा. बालाजीनगर, दुर्गेश ढाकणे रा. बालाजीनगर, पीयूष रा. पंचतारा बारजवळ, मानेवाडा, बारीक ऊर्फ बिसन बालाघाटी, अक्षय, भुऱ्या अशी आरोपींची नावे आहेत. सुमितला पोलिसांनी अटक केली आहे. मृत साहिलवर चोरीसह अन्य गुन्हे दाखल होते. त्याला गांजाचे व्यसन होते. दोन महिन्यांपूर्वीच तो एका प्रकरणातून बाहेर आला होता. आरोपीसुद्धा गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. त्यांच्यावरही चोरीसह अन्य गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत.
प्राप्त माहितीनुसार, मृतआणि आरोपी मित्र होते. सर्वमिळून चोरी करायचे. सर्वांनाच गांजाचे व्यसन होते. मंदिरातील दानपेट्या फोडणे, पळविण्यात ते तरबेज होते. चोरलेल्या रकमेच्या वाटपावरून काही दिवसांपासून त्यांच्यात धुसफूस सुरू होती. गुरुवारी रात्री सर्वजण गांजा ओढल्यानंतर दारू पीत बसले होते. जुन्याच कारणावरून त्यांच्यात पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी सर्व आरोपींनी एकत्र येत साहिलचे दोरीने हात बांधले. लाथाबुक्‍क्‍यांनी बेदम मारहाण केली. दरम्यान, जीव वाचविण्यासाठी साहिलने आरडाओरड सुरू केली. यामुळे आरोपींनी त्याच्या तोंडात कडक वस्तू, माती व पालापाचोळा कोंबून त्याचा आवाज थांबविला. निर्दयीपणे दोरीने गळा आवळून त्याचा खून केला. यानंतर मृतदेह गायत्रीनगरातील विश्वभारती सहकारी गृहनिर्माण संस्थेच्या मोकळ्या जागेत टाकून आरोपी पळून गेले.
आज सकाळी परिसरातील नागरिकांना मैदान मृतदेह आढळून आला. सूचना मिळताच अजनी पोलिसांचा ताफा घटनास्थळी दाखल झाला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करीत प्रयत्नपूर्वक आरोपीची ओळख पटविली. त्यानंतर आरोपींचा कशोशीने शोध सुरू करण्यात आला. काही वेळातच सुमितला अटक करण्यात आली असून अन्य आरोपींचाही शोध सुरू आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Murder of a partner by thieves