अनैतिक संबंधातून ऋषी खोसलाचा खून

अनैतिक संबंधातून  ऋषी खोसलाचा खून
नागपूर : प्रॉपर्टी डीलर आणि खोसला कुलरचा नामांकित व्यापारी ऋषी खोसलाचा मिकी बक्षी व त्याच्या साथीदाराने तलवारीने सपासप वार करून खून केला. खुनासाठी तब्बल एक कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली होती. पोलिसांनी मिकी बक्षी आणि गिरीश दासलवारला अटक केली असून दोघांचाही 25 ऑगस्टपर्यंत पीसीआर घेतला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युथ फोर्सचा संस्थापक मिकी बक्षी, बुकी सुनील भाटिया आणि ऋषी खोसला यांची मैत्री होती. मैत्रीचे नात्यात रूपांतर व्हावे म्हणून सुनील भाटियाची बहीण माधुरी (बदललेले नाव) हिच्याशी मिकी बक्षीकडे लग्नाचा प्रस्ताव ठेवला. मिकी आणि माधुरीचे 15 वर्षांपूर्वी लग्न झाले. त्यांना एक मुलगा आहे. परंतु माधुरीचे ऋषी खोसलासोबत लग्नाच्या पूर्वीपासूनच प्रेमसंबंध होते. मिकीसोबत खटके उडाल्यानंतर माधुरी पतीपासून विभक्‍त राहायला लागली आणि ऋषीशी तिने घरोबा केला होता. त्यामुळे मिकी चिडला होता. मिकीने ऋषीचा गेम करण्याचा प्लान केला. त्यासाठी कुख्यात गुंड गिरीश दासलवार, बबन कमलकर यांच्या टोळीला सुपारी दिली. बुधवारी रात्री दहा वाजता ऋषी कडबी चौकातून घरी जात होता. गिरीश दासलवार याने टोळीसह त्याचा पाठलाग केला. गोंडवाना चौक ते नेल्सन चौक दरम्यान आरोपींनी ऋषीची कार अडविली. त्याला बाहेर खेचले. तलवारीने सपासप वार करीत जागीच खात्मा केला आणि पळून गेले. सदर पोलिसांना माहिती मिळताच मुख्य आरोपी मिकी बक्षीविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली.
ऋषीची दिली सुपारी
गणेश मतेच्या हत्याकांडासह अन्य दोन हत्याकांड करणाऱ्या मिकी बक्षीने गिरीश दासलवार याला 1 कोटीची सुपारी दिल्याची चर्चा आहे. सुपारी मिळताच गिरीश गेल्या दोन महिन्यांपासून ऋषीच्या मागावर होता. काळ येताच घाला घालण्याच्या तयारीत असताना बुधवारी संधी चालून आली. प्रेयसी माधुरीला भेटून घरी परतत असताना ऋषीचा गेम करण्यात आला.
"तू सिंदूर लगाना बंद कर'
ऋषी खोसलाशी असलेले प्रेमसंबंध उघडकीस आल्यामुळे मिकीचा साळा सुनील भाटिया चिडला होता. त्यामुळे त्याने "तू सिंदूर लगाना छोड दे' अशी धमकी ऋषीच्या पत्नीला दिली होती, असा दावा पोलिसांनी केला आहे. त्यामुळे या हत्याकांडात सुनील भाटियाचा काही संबंध आहे का? याबाबत पोलिस चौकशी करीत आहेत. त्याला ताब्यात घेण्यासाठी एक पथक मुंबईला रवाना झाल्याची माहिती सदर पोलिसांनी दिली.
दीड वर्षापूर्वी खुनाचा प्रयत्न
गेल्या दीड वर्षापूर्वी ओल्ड एअरपोर्ट रोडवर ऋषी खोसलाच्या कारला विरुद्ध दिशेने भरधाव आलेल्या ट्रकने उडवले होते. या अपघातात ऋषीची कार चक्‍काचूर झाली होती. मात्र, ऋषी गंभीर जखमी होऊन वाचला होता. हा अपघात नसून त्याचा मिकीने खून करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा त्यावेळी होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com