आश्चर्यच! मिशा कापल्याने सलूनमालकावर गुन्हा दाखल

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 जुलै 2019

कन्हान शहर युवा दणका संघटनेचे अध्यक्ष किरण किसन ठाकूर हे सुनील लक्षणे यांच्या फ्रेंड्स जेन्टस पार्लर मध्ये मिशी व दाढी व्यवस्थित करण्यासाठी गेले. येथे सुनील लक्षणे यांनी कोणतीही विचारणा न करता थेट किरण  ठाकूर यांच्या मिशीवर वस्तरा फिरविला. यावरून दोघात वाद झाला. प्रकरण कन्हान पोलिसात पोहचले. मात्र केवळ वादावरून गुन्हा दाखल करण्यास पोलिसही तयार नव्हते. दोघांची पोलिसांनी समजूत घातली.

कन्हान (जि. नागपूर) : "मुछ नही तो कुछ नही' असे उगाच म्हटले जात नाही. एका हिंदी सिनेमात अमिताभ बच्चननेही "मुंछे हो तो नत्थुलाल जैसी' असे म्हणून एका मिशावाल्या व्यक्तीची प्रशंसा केली होती. त्यामुळे मिशा ठेवणाऱ्या युवकांनास माणसांना वेगळीच क्रेज आली आहे. एअरस्ट्राइकनंतर विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांच्या मिशा "राष्ट्रीय मिशा' घोषित करण्यात याव्यात, अशी अजब मागणी लोकसभेत करण्यात आली होती. यावरून मिशीचे महत्त्व किती आहे हे दिसून येते. एका न्हाव्याने न विचारता एका माणसाच्या मिशा कापल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कन्हान येथे उघडकीस आली. कन्हान शहरात या घटनेची चांगलीच चर्चा सुरू आहे.
कन्हान शहर युवा दणका संघटनेचे अध्यक्ष किरण किसन ठाकूर हे सुनील लक्षणे यांच्या फ्रेण्ड्‌स जेन्टस्‌ पार्लरमध्ये मिशी व दाढी व्यवस्थित करण्यासाठी गेले होते. येथे सुनील लक्षणे यांनी किरण ठाकूर यांना कोणतीही विचारणा न करता थेट त्यांच्या मिशांवर वस्तरा फिरविला. यावरून दोघांत वाद झाला. पूर्ण मिशी कापल्याने ठाकूर यांनी सलून मालक लक्षणे यांस फोन करून तू कारागीर कसे ठेवतो. माझी मिशी का कापली, असा सवाल करून नाराजी व्यक्त केली. त्यावर लक्षणे यांनी कापल्या असतील तुला जे करायचे ते करून टाक. तुला पाहून घेण्याची भाषा वापरली. हे प्रकरण कन्हान पोलिसात पोहोचले. मात्र केवळ वादावरून गुन्हा दाखल करण्यास पोलिसही तयार नव्हते. दोघांची पोलिसांनी समजूत घातली. मिशी कापल्याने आधीच संतापलेल्या किरण ठाकूर यांच्यासाठी इभ्रतीचा सवाल झाला होता. याचमुळे त्यांनी वकील, पोलिस व राजकीय नेते मंडळींशी चर्चा केली. सामाजिक क्षेत्रात काम करणारे सर्वत्र परिचित असल्याने मिशा कापल्यामुळे त्यांना अवघडल्यासारखे वाटत आहे. यामुळे त्यांचा जनसंपर्क कमी झाला आहे. याशिवाय त्यांच्या मुलाच्या शाळेने किरण ठाकूर यांचे ओळखपत्र तयार केले आहे. त्यावर असलेला फोटोमध्ये त्याच्या मिशा आहेत. आता त्यांना मुलाला भेटायला जायचे असल्यास मिशा नसल्याने प्रवेश दिला जाणार नाही, असाही तर्क दिला. यावर कन्हान पोलिसांनी न्वाही सुनील लक्षणे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची चर्चा मात्र कन्हान शहरात चांगलीच रंगली आहे. विशेष म्हणजे, मिशीसाठी जिल्ह्यातील मोठ्या नेत्यांकडून राजकीय दबाव आणल्याचीही चर्चा कन्हान शहरात रंगली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the mustache was cut off the case filed on the barber

टॅग्स