नदीमने बनविला केवळ दहा रुपयांत "वॉटर फिल्टर' 

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 1 February 2020

नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केलेल्या नदीम खानने नैसगिक पद्धतीने पाणी शुद्ध करणाऱ्या यंत्राचा शोध लावला.

नागपूर : अलीकडे सर्वसामान्य नागरिक आरोग्याबाबत अधिक सजग झाले आहे. याला कारण पाण्याच्या माध्यमातून होणारे विविध आजार, पाण्यामध्ये असणारे फ्लोराईड आणि इतर विषाक्त घटक आहेत हे आहेत. त्यामुळे आज केवळ कुटुंबातच नव्हे तर लग्नसोहळ्यांसारख्या इतर सार्वजनिक कार्यक्रमांमधून आरओचे पाणी पिण्यास मिळत आहे. मात्र, पाणी शुद्ध करण्याचे हे यंत्र महागडे असल्याने सगळ्यांनाच पडवडेल, असे नाही. 

नैसगिक पद्धतीचे शुद्ध पाणी

आरओचे पाणी शंभर टक्के शुद्ध असते, असा सर्वांचा समज आहे. मात्र, अनेक फिल्टर पाण्यात असलेले आवश्‍यक मिनरल्स काढून घेत आहेत. यावर उपाय म्हणून नागपूर इन्स्टिट्यूट ऑफ टेक्‍नॉलॉजी महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी प्राप्त केलेल्या नदीम खानने नैसगिक पद्धतीने पाणी शुद्ध करणाऱ्या यंत्राचा शोध लावला. त्या यंत्राला त्याने "ब्ल्यू मिनरल' असे नाव दिले आहे. विशेष म्हणजे हे यंत्र तयार करण्यास केवळ दहा रुपये खर्च आला आहे. 

इंडियन स्टण्डर्ड असोसिएशनने प्रमाणित 

घराबाहेर मिळणारे पिण्याचे पाणी शंभर टक्के शुद्ध असेल याची खात्री देता येत नाही. अनेकदा बाहेरचे पाणी पिऊन तहान भागवावी लागते. मात्र, पाणी शुद्ध नसल्यास आरोग्याच्या समस्यांनाही तोंड देण्याची वेळ येऊ शकते. नेमकी हीच बाब लक्षात घेऊन नागपूरचा युवा संशोधक नदीम खान याने सर्वांना परवडणारे आणि अशुद्ध पाणी झटकन शुद्ध करून ते पिण्यायोग्य करणारे छोटे खिशात मावेल अशा "ब्ल्यू मिनरल वॉटर फिल्टर'चा शोध लावला आहे. विशेष म्हणजे, याची विविध स्तरावर चाचणी झाली असून इंडियन स्टण्डर्ड असोसिएशनने याला प्रमाणित केले आहे. या माध्यमातून जवळपास एक हजार लिटर शुद्ध पाणी मिळवता येऊ शकते, असा नदीमचा दावा आहे. 

अवश्‍य वाचा : दोन मुलांच्या आईने प्रियकरावर ठेवला आंधळा विश्‍वास... अन्‌  

"ऍमेझॉन', "फ्लिपकार्ट'वरही उपलब्ध 

केवळ तीन इंचाचे हे यंत्र असून याद्वारे पाण्यातील सर्व आवश्‍यक "मिनरल' मिळवता येतात, असेही नदीम सांगतो. चारकोल ऍक्‍टिव कार्बन, चांदीसह अनेक प्रकारच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून हे यंत्र विकसित केले आहे. सध्या ऑनलाईन बाजारात अग्रेसर असलेल्या "ऍमेझॉन' आणि "फ्लिपकार्ट'च्या संकेतस्थळावरही हे यंत्र उपलब्ध आहे. 

बाजारात वाढती मागणी 

आतापर्यंत 15 हजारांहून अधिक "ब्ल्यू मिनरल'ची विक्री झाली असून बाजारात त्याची मागणी कायम आहे. "ब्ल्यू मिनरल' वॉटर फिल्टरला "इंडियन स्टॅण्डर्ड ऑर्गनायझेशन (आयएसओ), नॅशनल ऍक्रीडिटेशन बोर्ड ऑफ लेबॉरेटरी (एनएबीएल) आणि केंद्रीय पर्यावरण, वने व हवामान बदल मंत्रालय (एमओईएफसीसी) यांनी प्रमाणित केले आहे. 

नक्षलग्रस्त भागातील जवानांसाठी फायद्याचे 

गोंदिया, गडचिरोलीचा भाग नक्षलग्रस्त आहे. येथे पोलिस जवानांच्या तुकड्या चार-पाच दिवस जंगलात गस्तीवर असतात. नाईलाजाने त्यांना नदी-नाल्याचे अशुद्ध पाणी प्यावे लागते. परंतु नदीमने विकसित केलेले "ब्ल्यू मिनरल' वापरून हे जवान शुद्ध पाणी मिळवू शकतात. 

90 टक्के आजार हे दूषित पाणी पिल्यामुळे होतात. शाळा, महाविद्यालय किंवा प्रवासात प्रत्येक वेळी फिल्टरचे पाणी मिळेलच याची शाश्वती नसते. ही बाब लक्षात घेऊन मी "ब्ल्यू मिनरल वॉटर फिल्टर' विकसित केले आहे. 
- नदीम खान, संशोधक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nadeem made water filter for only ten rupees