प्रचारतोफा आज थंडावणार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 जानेवारी 2017

नगर परिषद निवडणूक - गोंदिया, तिरोडा येथील १७१ केंद्रांवर होणार मतदान
गोंदिया - गोंदिया व तिरोडा नगर परिषदेची निवडणूक रविवारी (ता. ८) होणार आहे. या निवडणुकीत उभ्या असलेल्या पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केला. अख्खे शहर प्रचाराच्या रणधुमाळीत न्हाऊन निघाले. अखेर आज, शनिवारी रात्री १० वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत.

नगर परिषद निवडणूक - गोंदिया, तिरोडा येथील १७१ केंद्रांवर होणार मतदान
गोंदिया - गोंदिया व तिरोडा नगर परिषदेची निवडणूक रविवारी (ता. ८) होणार आहे. या निवडणुकीत उभ्या असलेल्या पक्ष आणि अपक्ष उमेदवारांनी प्रचाराचा धुमधडाका सुरू केला. अख्खे शहर प्रचाराच्या रणधुमाळीत न्हाऊन निघाले. अखेर आज, शनिवारी रात्री १० वाजता प्रचारतोफा थंडावणार आहेत.

प्रचारतोफा थंडावणार असल्या तरी, छुप्या पद्धतीने प्रचार  रात्रभर सुरू राहील, यात तिळमात्र शंका नाही. दरम्यान, गोंदिया शहरातील १४३ तर, तिरोडा शहरातील २८ केंद्रांवरून मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आदी प्रमुख पक्ष स्वतंत्ररीत्या नगर परिषदेच्या निवडणूक रणसंग्रामात अपक्ष उमेदवारांना ३० डिसेंबरला निवडणूक चिन्हांचे वाटप झाल्यानंतर या उमेदवारांनीही प्रचाराला गती दिली. गोंदिया नगर परिषदेच्या २१ प्रभागातील ४२ सदस्यांसाठी २५७ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. तिरोड्यात १७ जागांकरिता ७६ उमेदवार रिंगणात आहेत. गोंदिया नगर परिषद अध्यक्षपदाकरिता १४ तर, तिरोडा नगर परिषद अध्यक्षपदाकरिता आठ उमेदवार नशीब अजमावत आहेत. यातील पक्षाच्या उमेदवारांनी १७ डिसेंबरपासूनच प्रचाराला धडाक्‍यात सुरुवात केली. अपक्ष उमेदवारांना मात्र, ३० डिसेंबरपर्यंत वाट पाहावी लागली. आता सर्वच उमेदवारांचे प्रचार वाहन सकाळपासून सायंकाळपर्यंत या गल्लीतून त्या गल्लीत कानठळ्या बसवत फिरत आहेत.

नगराध्यक्षपद व नगरसेवकपदाच्या उमेदवारांचा व्हॉट्‌सॲप, फेसबुक व ट्विटरच्या माध्यमातून प्रचार सुरू आहे. रोड शो, डोअर टु डोअर भेटी, सभा घेण्यात येत आहेत. अखेर आज, शुक्रवारी रात्री १० वाजता प्रचार थांबणार असून, निवडणुकीच्या कामाला प्रशासकीय  यंत्रणा सज्ज झाली आहे.

गोंदिया येथील १४३ तर, तिरोडा शहरातील २८ केंद्रांवरून मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. दोन्ही केंद्रांवर एक हजारावर कर्मचारी कर्तव्य बजावणार आहेत. मतदान केंद्र परिसरात शांतता व सुव्यवस्था कायम राहावी, निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, याकरिता मतदानाच्या दिवशी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. शिवाय शांतता भंग करणाऱ्यांवर निवडणूक विभागातर्फे कारवाई केली जाणार आहे.

उद्या मतदान 
नगर परिषद निवडणुकीकरिता रविवारी (ता.८) सकाळी साडेसात ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत मतदान प्रक्रिया राबविली जाणार आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. सोमवारी (ता. ९) गोंदिया नगर परिषदेच्या उमेदवारांची मतमोजणी गोरेगाव रोडवरील शासकीय पॉलिटेक्‍निक महाविद्यालयात तर, तिरोडा येथील मतमोजणी खैरबोडी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत करण्यात येणार आहे.

Web Title: nagar parishad election publicity stop