किती ही मस्ती? गंमत म्हणून केले असे अन्‌...

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

युवक रस्त्याने पायी घरी जात होता. मस्ती करीत असतना त्याला साप जाताना दिसला. त्याने सापासोबत मस्ती करण्याचा प्रयत्न केला अन्‌.... 

नागपूर : साप... नुसत्या नावाने भल्याभल्यांना कापरे भारतात. अशात कुणाच्या घरात, शेतात, फ्लॅटमध्ये एखादा साप घुसला तर सर्वत्र चर्चेचा विषय होऊन जातो. भयभीत झालेले लोक ती जागा सोडून दुसरीकडे पळून जातात. "साप... साप... साप...' असे ओरडत फिरतात आणि दुसऱ्यांना भयभीत करतात. भीतभीत सापाला मारण्याचा किंवा पकडण्याचा सल्ला दुसऱ्यांना देत असतात. सहज सापाशी खेळ करण्याचा प्रताप युवकाने केला आणि झाले असे काही... 

नाव दीपक गजभिये (वय 28, रा. भिलगाव)... हा रस्त्याने मस्ती करीत पायी घरी जात होता. त्याला रस्त्यावरून सरपटत जाणारा साप दिसला. दीपकने सापाला डिवचण्याचा प्रयत्न केला व गोटे मारले... सापाची शेपटी पकडून खेळ करीत होता. दरम्यान, सापाने त्याच्या दोन्ही हातांना चावा घेतला. साप चावल्यानंतर घाबरलेल्या दीपकने धूम ठोकून घर गाठले. घरी येत असताना सापने चाबा घेतल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. घाबरलेल्या कुटुंबीयांनी दीपकला उपचारार्थ रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्याचा मृत्यू झाला. 

सविस्तर वाचा - पत्नीने केला दुसरा घरोबा.... रागाच्या भरात पतीने उचलले हे पाऊल

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (ता. 14 डिसेंबर) रात्री साडेनऊला दीपक रस्त्याने पायी घरी जात होता. त्याला तुलसी लॉनजवळील रस्त्यावरून साप सरपटत जाताना दिसला. त्याने सापाला डिवचण्याचा प्रयत्न केला. सापची शेपटी धरून उचलले. मात्र, सापाने वेटोळे घालून दीपकच्या हाताला चावा घेतला. त्यामुळे त्याने हातातील साप फेकून दिला. मात्र, सापाने त्याच्या दुसऱ्याही हाताला चावा घेतला. 

अधिक माहितीसाठी - निराधार व अंध असूनही मिळविले हे यश... वाचा ही प्रेरणादायी कहाणी

साप चावल्याने जीव वाचविण्यासाठी दीपकने घराकडे पळ काढला. घरी पोहोचताच त्याने कुटुंबीयांना सांगितले. त्याला लगेच मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान रविवारी (ता. 22) पहाटे साडेपाचच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी मिळालेल्या सूचनेवरून यशोधरानगर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One dies of snake bite in Nagpur