'पत्नी और वो'चा फेरा अन्‌ त्याने कवटाळले मृत्यूला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

हाताला पुरेसे काम नाही, गावीही पैसे पाठवायचे, त्यात नवीन भानगड, पत्नी आणि घरच्यांचे काय?, मैत्रीणही परतण्यास तयार नाही, असे अनेक प्रश्‍न युवकाला भेडसावत होते. या सर्व विचारातून युवकाने आत्महत्या केली. मात्र, समस्या सुटली नसून, नवीनच बाब समोर आली आहे. 

नागपूर : काही दिवसांपूर्वी नागपूर रेल्वेस्थानकावरील युवकाच्या आत्महत्या प्रकरणात वेगळीच भानगड समोर आली आहे. "पत्नी और वो'च्या फेऱ्यात युवकाने मृत्यूला जवळ केले. त्याच्या जाण्याने पेच सुटला नाही, उलट पत्नी, तीन महिन्यांचे बाळ आणि "ती' अशा तीन जिवांच्या भवितव्याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. बिरबल कुथ्थू पहारिया (वय 25) असे मृताचे नाव आहे.

बिरबल कुथ्थू पहारिया हा ओडिशाचा राहणारा होता. शनिवारी रात्री तो तरुणीसोबत नागपूर रेल्वेस्थानकावर आला. रेल्वेगाडीवर चढून उच्चदाब वीजवाहिनीला स्पर्श केला. सोडविण्याचे प्रयत्न केले असता छतावरून पडून त्याचा मृत्यू झाला होता. सोबत असणारी तरुणी प्रारंभी बिरबल तिचा पती असल्याचे सांगत होती. पण, पोलिसांच्या सूचनेवरून घरचे आल्यानंतर वेगळीच बाब समोर आली.

 

क्लिक करा - हे देवा! निवासी गाळे झाले सायकल स्टॅण्ड 

 

सोबत असणारी तरुणी त्याच्या गावातीलच राहणारी असल्याने त्यांच्यात मैत्री होती, पण ती पत्नी मात्र नव्हती. बिरबलचे गेल्या वर्षीच लग्न झाले होते. तो कामाच्या निमित्ताने हैदराबादला राहत होता तर त्याची पत्नी बाळंतपणासाठी गावी गेली होती. दसऱ्यादरम्यान तिने मुलाला जन्म दिला. बिरबल हैदराबादला एकटाच होता. त्याने मैत्रिणीला फोन करून जवळ बोलावून घेतले. मागचा पुढचा विचार न करता तीसुद्धा निघून आली. ती दिसत नसल्याने कुटुंबीयांनी पोलिसात तक्रारही नोंदविली होती.

मंगळवारी तरुणी आणि मृताचे नातेवाईक नागपुरात पोहोचल्यानंतर प्रकरणातील वास्तविकता समोर आली. पैशांअभावी पत्नी आणि मुलाला मृताच्या अंत्यदर्शनासाठीही येता आले नाही. मोक्षधामवर दफनविधी उरकून सर्व मंडळी गावी परतली.

 

असे का घडले? - निराशा पदरी पडली अन्‌ युवतीने उचलले हे पाऊल

 

विविध प्रश्‍नांनी होता हैराण

तिकडे हाताला पुरेसे काम नाही, गावीही पैसे पाठवायचे, त्यात नवीन भानगड, पत्नी आणि घरच्यांचे काय?, मैत्रीणही परतण्यास तयार नाही, असे अनेक प्रश्‍न त्याला भेडसावत होते. तिला घेऊन तो गावी जाण्यासाठी निघाला. परंतु, हिंमत होत नव्हती. सुमारे आठ दिवस ते नागपूर परिसरातच फिरत राहिले. पण, उपाय मिळत नव्हता. शनिवारी सायंकाळी दोघेही रेल्वेस्टेशनवर आले. समजावूनही मैत्रीण ऐकून घेत नसल्याने तो छतावर चढला. मागोमाग मैत्रीणही वर चढली. ती त्याला खाली खेचत होती. तर तो आत्महत्येबाबत बोलत होता. अचानक त्याचा उच्चदाब वाहिनीला स्पर्श झाला. तो खाली पडला आणि त्याचा मृत्यू झाला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: A new turning point in suicide at the Nagpur train station