याड लागलं..! मेट्रो फिडर सेवेतील सायकलला तरुणाईचा प्रतिसाद

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2019

दिवसेंदिवस या सायकलची मागणी वाढत आहे. ही सायकल पंक्‍चर होत नसल्याने कुठलाही मनस्ताप नाही. नागरिकांसाठी लवकरच ई-सायकल, बाईक, इलेक्‍ट्रिक बाईक उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

नागपूर : महामेट्रोने फिडर सेवेसाठी नवनव्या उपाययोजना केल्या असून, त्यातील सायकलची तरुणाईत चांगलीच "क्रेझ' आहे. दररोज पाचशेवर सायकलीचा वापर होत असल्याने तरुणाईला या सायकलने चांगलेच वेड लावल्याचे दिसून येत आहे. 

प्रदूषणरहित वातावरण तयार करण्यासाठी महामेट्रोने पर्यावरणपूरक फिडर सेवेकडे नागरिकांचे लक्ष वेधले आहे. किंबहुना सायकलच्या स्वरूपात ही सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिली आहे. महामेट्रोच्या सीताबर्डी इंटरचेंजसह एअरपोर्ट, साउथ एअरपोर्ट, खापरी, लोकमान्यनगर, सुभाषनगर स्टेशनवर या सायकल नागरिकांसाठी उपलब्ध आहे. नागरिकांत, विशेषतः तरुणाईला या सायकलने वेड लावल्याचे दिसून येत आहे. दररोज पाचशेवर सायकलचा वापर करण्यात येत आहे. यात प्रामुख्याने तरुणाईचा समावेश असल्याचे महामेट्रोने नमूद केले आहे. दरमहा 300 रुपये भाड्याने अत्याधुनिक सायकल मिळत असल्याने त्या चालविण्याचा तरुणाई आनंद लुटत आहे. मेट्रो स्टेशनवरून सायकल घेत विद्यार्थी शाळा, महाविद्यालयात जात आहे. महामेट्रोच्या स्टेशनसह विविध खासगी कंपन्या, शाळा, महाविद्यालये, रहिवासी क्षेत्रातही या सायकल उपलब्ध आहे. नागरिकांनी या साधनांचा जास्तीत जास्त वापर करण्याचे आवाहन महामेट्रोने केले आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, bicycle, metro feeder, youth