भाजपचा जल्लोष; राष्ट्रवादीचा निषेध, कॉंग्रेसचे मौन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 24 नोव्हेंबर 2019

कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिवसभर संयम पाळला. या वादात कुठलाच नेता पडला नाही. कोणी प्रतिक्रियासुद्धा या घटनेवर व्यक्त केली नाही.

नागपूर : राज्यात राजकारणाने अभूतपूर्व तेवढीच धक्कादायक कलाटणी घेतल्याने सर्वच राजकीय पक्ष बुचकाळ्यात पडले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेतल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. दुसरीकडे अजित पवार यांनी भाजपशी हातमिळवणी केल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमात सापडले. त्यांनी फक्त अजित पवारांचा निषेध नोंदवला तर महाआघाडीत सॅंडविच झाल्याने कॉंग्रेसने या राजकीय घडामोडींवर मौन पाळले. 

सकाळ उजाडताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री तर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्याचे वृत्त धडकले आणि सर्वांचा एकच गोंधळ उडाला. सेना-राष्ट्रवादी-कॉंग्रेस आजच सत्तास्थापनेचा दावा करणार असल्याने सत्ता पालटल्याचे बघून अनेकांना धक्का बसला होता. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना विश्‍वासच बसत नव्हता. कार्यकर्ते सरैभर झाले होते. बडे नेते अजित पवारच सोडून गेल्याने सर्व कार्यकर्ते संभ्रमात सापडले होते. शरद पवार यांची पत्रकार परिषद, दुपारी आमदारांच्या बैठकीला अजित पवार, धनंजय मुंडे यांनी हजेरी लावल्याने कार्यकर्त्यांना धीर आला. मात्र रात्री उशिरापर्यंत चित्र काहीच स्पष्ट झाले नसल्याने सर्व कार्यकर्ते फक्त आशेवर आहेत. कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी मात्र दिवसभर संयम पाळला. या वादात कुठलाच नेता पडला नाही. कोणी प्रतिक्रियासुद्धा या घटनेवर व्यक्त केली नाही. शहर कॉंग्रेसतर्फे अजित पवार यांना सोडून राज्यपालांचा निषेध नोंदण्यात आला. 

ढोलताशे वाजवून आनंदोत्सव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची दुसऱ्यांदा शपथ घेताच भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. शनिवारी सायंकाळी पाच वाजता महाल टिळक पुतळा येथील भाजपच्या कार्यालयाजवळ फाटके फोडून आणि ढोलताशे वाजवून आनंदोत्सव साजरा करून भाजपचा जयघोष करण्यात आला. शहराध्यक्ष प्रवीण दटके, आमदार गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, मोहन मते, विकास कुंभारे, महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात झालेल्या जल्लोषात संदीप जाधव, सुभाष पारधी, नंदा जिचकार, अर्चना डेहनकर, भोजराज डुम्बे, जयप्रकाश गुप्ता, चेतना टांक, किशन गावंडे, प्रगती पाटील, राजीव पोतदार, दयाशंकर तिवारी, शिवानी दाणी, महेंद्र राऊत, रमेश भंडारी, देवेन दस्तुरे, किशोर पलांदुरकर, प्रभाकर येवले, मनीष मेश्राम, नवनीत तुली, धर्मपाल मेश्राम, सतीश रिरसवान, सतीश वडे, किशोर पेठे, मनीषा काशीकर, डॉ. कीर्तिदा अजमेरा, दिव्या धुरडे, विंकी रुघवानी, प्रताप मोटवानी, गुडडू खान, गजेन्द्र पांडे, चंदन गोस्वामी यांच्याशिवाय शेकडो कार्यकर्ते यात सहभागी झाले होते. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, bjp, congress, ncp, cm, minister, oath