नागपूर : भरधाव कारने चिमुकलीस चिरडले; आईच्या मांडीवरच सोडला प्राण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2019

उपचारासाठी इस्पितळात नेण्यापूर्वीच निधीने आईच्या मांडीवरच प्राण सोडले. सविता या धाय मोकलून हंबरडा फोडत होत्या.

नागपूर : हातातून रस्त्यावर पडलेली संत्री उचलण्याच्या नादात एका चिमुकलीचा जीव गेला. भरधाव कारचे दोन्ही चाके पोटावरून गेल्यामुळे चिमुकली जागीच ठार झाली. ही हृदयद्रावक घटना बुधवारी दुपारी नंदनवन परिसरातील श्रीकृष्णानगरात घडली. निधी ब्रिजभूषण पटेल (वय अडीच वर्षे) असे अपघातात ठार झालेल्या चिमुकलीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नंदनवनमधील श्रीकृष्णानगरात राहणारे ब्रिजभूषण पटेल हे खासगी वाहनावर चालक म्हणून काम करतात. पत्नी सविता गृहिणी आहे. त्यांना चार मुली असून निधी ही सर्वांत लहान मुलगी आहे. बुधवारी सकाळी अकरा वाजता पटेल यांच्या तीनही मुली शाळेत गेल्या होत्या तर निधी ही घरी खेळत होती. दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास निधी दारात बसून संत्री खात होती. तिची आई सविता तांदूळ निवडत होती. त्यांचे घर वस्तीच्या वळणावर असल्यामुळे रस्त्यावरील वाहने जवळ येईपर्यंत दिसत नसल्याने हा रस्ता धोकादायक आहे. निधीच्या हातातील संत्री खाली पडली. ती उचलण्यासाठी निधी पळत-पळत रस्त्यावर गेली. दरम्यान, भरधाव आलेल्या कारने निधीला धडक दिली आणि खाली पडलेल्या निधीच्या अंगावरून कारची दोनही चाके गेली. या अपघातात निधीचा जागीच मृत्यू झाला. नंदनवनचे पोलिस निरीक्षक संदीपान पवार हे पथकासह घटनास्थळावर पोहोचले. या प्रकरणी तक्रारीवरून नंदनवन पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला.

चालकाचे कारसह पलायन
निधीला चिरडल्यानंतर कारचालक पळून गेला. दारात उभ्या असलेल्या सविता यांनी लगेच रस्त्यावर धाव घेतली. रक्‍तबंबाळ अवस्थेत पडलेल्या निधीला आईने मांडीवर घेतले. उपचारासाठी इस्पितळात नेण्यापूर्वीच निधीने आईच्या मांडीवरच प्राण सोडले. सविता या धाय मोकलून हंबरडा फोडत होत्या.

परिसरात तणावपूर्ण शांतता
कारचालकाने अपघात केल्यानंतर थेट कारसह पलायन केले. या घटनेमुळे परिसरात तणावपूर्ण शांतता होती. मात्र, नंदनवन पोलिसांनी वेळीच गांभीर्य दाखविल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात होती.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, car crushed girl, accident