गहिवरल्या पाषाणाच्या भिंती

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 मे 2018

वर्धा रोड - भल्या-भल्या गुन्हेगारांना घाम फोडणाऱ्या नागपूर मध्यवर्ती कारागृहाने शनिवारी भावुक क्षण अनुभवले. निमित्त होते सिद्धदोष बंदी व किशोरवयीन मुलांच्या गळाभेट कार्यक्रमाचे. एकीकडे प्रियजनाला भेटीचा हर्ष त्याचवेळी अनावर झालेले अश्रू आपसूकच ओघळत होते. या भारावलेल्या हळव्या क्षणांनी कारागृहाच्या पाषाणाच्या भिंतीही गहिवरल्या.

राग, द्वेष, आमिष, अनैतिकतेला बळी पडून, तर कधी कळत-नकळत हातून गुन्हा घडतो आणि बंदिस्त कारागृहात पश्‍चात्तापाने होरपळण्याची वेळ येते. कुटुंबालाही त्याच्या झळा सोसाव्या लागतात. शिक्षेच्या काळात आप्तस्वकियांच्या भेटीची आस अधिकच तीव्र होते. परिणामी बंदी कारागृहातच मानसिकदृष्ट्या खचतात. ही बाब लक्षात घेऊन कारागृह प्रशासनातर्फे वर्षातून दोनवेळा गळाभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते.

शनिवारी ७१ बंद्यांच्या एकूण १४३ मुलांनी कारागृहात बंदिस्त असलेल्या आई किंवा वडिलांची ३० मिनिटे भेट घेतली. यात काही मुले प्रथमच आईवडिलांना भेटणारीही होती. मायेला पारखे झालेल्या मुलांना कुशीत घेत जणू माय-बापांनी त्यांना अश्रूंनीच न्हाऊ घातले. बंद्यांनी पानावलेल्या डोळ्यांनी घट्ट मिठी मारून खूप शिका मोठे व्हा, अशी भावनिक साद घालत पाल्यांना निरोप दिला.

भरवलेला घास अमृताहूनही गोड
पाल्यांना खाऊ घेऊन देता यावा यासाठी कारागृहातील उपहारगृहामार्फत बंद्यांना बिस्कीट, चॉकलेट, चिवडा, वेफर्स आदी पदार्थ उपलब्ध करून दिले होते.  सर्वच बंद्यांनी हा खाऊ खरेदी करून मुलांना भरविला. प्रेमाने भरवलेला घास त्या क्षणी मुलांसाठीही अमृताहून गोड ठरला. 

गाऱ्हाणी आणि तक्रारी
डोळ्यांनी न दिसणाऱ्या बंदीवानांसोबत त्यांची मुले चांगलीच मिसळली. मित्रांसोबतच्या भांडणाची तक्रार, शाळेतील गमतीजमती, घरातील मंडळींची गाऱ्हाणी मुलांनी केली. कुणी रेखाटलेले चित्र व कलाकृतीही पालकांना दाखविण्यासाठी घेऊन आले होते. चर्चा, खोड्या, मौजमस्तीत अर्धा तास कसा गेला कुणालाच कळले नाही.

Web Title: nagpur central jail accused family