वर्षभरात झाले शहर अस्वच्छ?

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 5 मे 2017

स्वच्छ भारत अभियानात नागपूर माघारले

स्वच्छ भारत अभियानात नागपूर माघारले
नागपूर - वर्षभरापूर्वी देशातील पहिल्या वीस स्वच्छ शहरांमध्ये समाविष्ट असलेले नागपूर एकदम 139 व्या क्रमांकावर फेकले गेल्याने महापालिकेला चांगलाच धक्का बसला आहे. आजच मुख्यमंत्र्यांनी चोवीस बाय सात या योजनेसाठी नागपूर महापालिकेला पुरस्कार दिला तर दुसरीकडे स्वच्छ भारत अभियानात पहिल्या पन्नास शहरांमध्ये नागपूरचा समावेश नसल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. वर्षभरात असे काय घडले की शहर अचानक अस्वच्छ झाले, असा प्रश्‍न महापालिकेतील अधिकारी आणि पदाधिकाऱ्यांना पडला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. यावर्षीची 434 स्वच्छ शहरांची यादीत केंद्र शासनाने जाहीर केली. यात पहिल्या शंभर शहरांमध्येही नागपूरचा समावेश नाही. विशेष म्हणजे नागपूर झपाट्याने विकसित होत आहे. सर्वत्र सिमेंट कॉंक्रिटचे रस्ते सुरू आहे.

चोवीस बास सात योजना राबविल्या जात आहे. मेट्रो रेल्वेचे कामही झपाट्याने सुरू आहे. नागपूर महापालिकेने स्वच्छतेचे आउटसोर्सिंग केले आहे. कनक रिसर्च मॅनेजमेंटतर्फे घरोघरी जाऊन कचऱ्याची उचल केली जात आहे. शहराला डस्टबिन फ्री करण्यात आले आहे. भांडेवाडी डंपिंग यार्ड येथे शहरातील कचरा थेट उचलून टाकला जात आहे. येथे कचऱ्यावर प्रक्रियासुद्धा केली जात आहे. याच कारणामुळे मागील वर्षी स्वच्छ भारत अभियानात नागपूरचा पहिल्या वीस शहरांमध्ये समावेश करण्यात आला होता. मागील वर्षाप्रमाणे स्वच्छतेच्या योजना, प्रक्रिया नियमितपणे सुरू असताना अचानक नागपूर अस्वच्छ कसे झाले, असा प्रश्‍न महापालिकेच्या अधिकाऱ्यांना पडला आहे. एकतर मागील वर्षी झालेल्या सर्वेक्षण चुकले असेल किंवा यंदाचे असेही बोलले जात आहे.

Web Title: nagpur city uncleaned