राष्ट्रवादीचा जल्लोष, सेनेची आतषबाजी, कॉंग्रेसमध्ये उत्साह

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

सरकारमध्ये सामील झालेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांतही उत्साह ओसंडून वाहताना दिसला. जल्लोष साजरा केला नसला तरी कॉंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे चेहरे चांगलेच खुलले. 

नागपूर : राज्यात महाविकास आघाडी सरकारचा मार्ग मोकळा होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी एकच जल्लोष केला. रात्रीला शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी निवड होताच शिवसेनेने फटाके फोडून आनंद व्यक्त केला. कॉंग्रेसने जल्लोष केला नसला तरी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला आहे. 

दुपारी नाट्यमयरित्या अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यांच्या पाठोपाठ सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. त्यानंतर शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेस व कॉंग्रेस या तिन्ही पक्षाचे स्थापन करण्याच्या दिशेने हालचालींना वेग आला. सायंकाळी मुंबईत तिन्ही पक्षांच्या बैठकीत शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी निवड करण्यात आली. देवेंद्र फडणवीस सरकार पायउतार होताच राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जीपीओ चौकात नृत्य करून आनंद व्यक्त केला. शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या माजी अध्यक्ष नूतन रेवतकर, योगेश कोठेकर यांनी कार्यकर्त्यांसह मिठाई वाटली. शहराच्या इतर भागातही राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला. रात्री उद्धव ठाकरे यांच्या नावाची मुख्यमंत्रिपदासाठी निवड होताच रेशीमबाग येथील सेनाभवनात बसलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आनंद साजरा केला. शिवसेनेतर्फे उद्या, बुधवारी महाल येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला माल्यार्पण करून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार असल्याचे जिल्हाप्रमुख माजी खासदार प्रकाश जाधव यांनी सांगितले. सरकारमध्ये सामील झालेल्या कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांतही उत्साह ओसंडून वाहताना दिसला. जल्लोष साजरा केला नसला तरी कॉंग्रेस कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांचे चेहरे चांगलेच खुलले. 

भाजप कार्यालयामध्ये शुकशुकाट 
कॉंग्रेसचे माजी शहर अध्यक्ष शेख हुसेन यांनी अहंकारामुळेच भाजप सरकार सत्तेतून गेले असून नागरिकांना मोठा दिलासा मिळाल्याचा टोला हाणला. भाजप सरकार केवळ घोषणा करणारे असून नागरिकांच्या दुःखाच्या खाईत लोटल्याचाही त्यांनी आरोप केला. महाविकास आघाडीचे सरकार पाच वर्षे टिकेल तसेच जनतेच्या, प्रामुख्याने शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्यात यशस्वी होईल, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. भाजप कार्यालयामध्ये मात्र शुकशुकाट दिसून आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, congress, shivsena, ncp