सरसंघचालक बोलले शिक्षणावर, पडसाद उमटले राजकारणावर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

भौतिक जीवनात आत्मविश्‍वासाने यश कसे मिळवावे, हे आनंद कुमार यांच्याकडून शिकावे. माणूस दुसऱ्यांसाठी उपयोगी पडतो, तेव्हाच त्याची क्षमता कळते, असेही सरसंघचालक म्हणाले.

नागपूर : मनुष्य भौतिक सुखासाठी अहंकार बाळगतो. प्रसिद्धीसाठी स्वार्थी होतो, भांडतो. भांडणामुळे सर्वांचे नुकसान होणार आहे, हे माहीत असूनही आपले सर्वस्व पणाला लावतो. सत्याचा स्वीकार करीत नाही. स्वत:च्या स्वार्थासाठी वडीलधारे अन्‌ सत्ताधारी खोटे बोलतात, अशी विविध उदाहरणे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आपल्या भाषणात दिली. याचा संबंध राज्यात सुरू असलेल्या सत्ताकोंडीशी जोडून प्रत्येक जण आपापल्या परिने सोईस्कर राजकीय अर्थ काढत आहे.

आयपीईसीतर्फे आयोजित आंतरराष्ट्रीय मुख्याध्यापक परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत बोलत होते. या वेळी मंचावर देवेंद्र दस्तुरे, मृणालिनी दस्तुरे, मार्गदर्शक विजय फणशीकर, एस. पी. विश्‍वनाथन उपस्थित होते. याप्रसंगी मॉडर्न स्कूलच्या निरू कपाई यांना, सेंटर पॉइंट स्कूलच्या कार्यकारी संचालक मुक्ता चॅटर्जी यांना व सुपर थर्टी प्रोग्रॅमचे प्रणेते आनंद कुमार आणि प्रणव कुमार यांना सरसंघचालकांच्या हस्ते नचिकेता लाइफटाइम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

मर्यादा ओळखणे आवश्‍यक

याप्रसंगी सरसंघचालक म्हणाले, ""जीवन म्हणजे संघर्ष नव्हे, तर समन्वय आहे. केवळ शिक्षणाने अशी वृत्ती निर्माण होते. जगण्याच्या स्पर्धेत आपण नैसर्गिक साठा मर्यादेपलीकडे जाऊन वापरत आहोत. गरजेपुरते तेल व कोळसा काढायला हरकत नाही; पण किती काढावा, याची मर्यादा ओळखणे आवश्‍यक आहे. विज्ञानाच्या मर्यादा तोडून चालणार नाही. ही मर्यादा माणसाला शिक्षणातून कळते. तसेच वर्गखोलीतील ज्ञानाशिवाय व्यावहारिक ज्ञान विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचे आहे.'' प्रास्ताविक मृणालिनी दस्तुरे यांनी केले. संचालन समता वासुदेवा यांनी केले. आभार विजय फणशीकर यांनी मानले.

नचिकेताच्या वडिलांनी मरणावस्थेत असलेली गाय दान करण्याचा निर्णय घेतला. त्यांचे असे वागणे चुकीचे असल्याने नचिकेताने त्यांना "तुम्ही असे का वागता?' अशी विचारणा केली. तेव्हा "तू शांत राहा' असे वडिलांनी बजावले. तो त्यांच्या जगण्यातला संघर्ष असला, तरी भौतिक स्वार्थासाठी नेहमीच वडीलधारे व सत्ताधारी लोक असे वागत असल्याचे सरसंघचालकांनी सांगितले.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur : dr. mohan bhagvat