काँग्रेस नेत्यांच्या पुतळ्याचे दहन 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 फेब्रुवारी 2017

नागपूर : काँग्रेसलाही असंतुष्टांनी घेरले असून, शहर काँग्रेस अध्यक्षासह माजी केंद्रीय मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. काही नाराज कार्यकर्त्यांनी शवयात्रा काढून संतापाला वाट मोकळी करून दिली. 

नागपूर : काँग्रेसलाही असंतुष्टांनी घेरले असून, शहर काँग्रेस अध्यक्षासह माजी केंद्रीय मंत्र्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे दहन केले. काही नाराज कार्यकर्त्यांनी शवयात्रा काढून संतापाला वाट मोकळी करून दिली. 

उमेदवारी देण्यावरून काँग्रेसमध्ये घोळ झाला. उत्तर नागपुरात शहर काँग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे व माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार यांच्याविरोधात मोर्चाच उघडला म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कालही काहींनी संताप व्यक्त केला. आजही संतापाची लाट कायम होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास असंतुष्टांनी शहर काँग्रेसचे अध्यक्ष ठाकरे व माजी मंत्री मुत्तेमवार यांचे प्रतीकात्मक पुतळे जाळून रोष व्यक्त केला. हिवरीनगर चौकातही प्रदेशाध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांच्या पुतळ्याची प्रेतयात्रा काढून काहींनी मुंडन केले. या नाराजीचा फटका काँग्रेसच्या अधिकृत उमेदवारांना होण्याची शक्‍यता व्यक्त करण्यात येत आहे. 

अटल बहादूरसिंगांनी व्यक्त केली नाराजी 
महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेसने लोकमंचसोबत आघाडी केली. या आघाडीनुसार प्रभाग क्रमांक 9 मध्ये लोकमंचला तीन जागा देण्यात आल्या. यात लोकमंचचे ओबीसी पुरुष प्रवर्गातून विनिल चौरसिया यांना अधिकृतरीत्या काँग्रेसने एबी फॉर्म दिला. त्याचवेळी याच प्रवर्गातून किशोर जिचकार यांनाही एबी फॉर्म देण्यात आल्याने माजी महापौर व लोकमंचचे अध्यक्ष सरदार अटल बहादूरसिंग यांनी नाराजी व्यक्त केल्याचे लोकमंचचे नेते बब्बी बावा यांनी पत्रकाद्वारे कळविले.

प्रभाग 9 मध्ये अनुसूचित जमाती प्रवर्गातून स्नेहा मिलिंद निकोसे, ओबीसी पुरुष प्रवर्गातून विनिल चौरसिया, महिला सर्वसाधारण प्रवर्गातून हेमांद्री थूल तर सर्वसाधारण पुरुष प्रवर्गातून स्वतः उमेदवार असल्याचे बब्बी बावा यांनी नमूद केले. विनिल चौरसियाच अधिकृत उमेदवार असल्याचे त्यांनी जोर देऊन सांगितले. 

Web Title: Nagpur Election Congress Municipal Corporation election