नागपूर : युवा खेळाडूला क्रीडा गुणांपासून डावलले!

हडसच्या विद्यार्थ्यावर ‘डीएसओ’ व शिक्षण मंडळाकडून अन्याय झाल्याचा आरोप
Nagpur Sports Marks of Student
Nagpur Sports Marks of Student

नागपूर : खेळाडू असलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान भरून काढण्यासाठी शासनातर्फे त्यांना दरवर्षी क्रीडा गुण दिले जाते. मात्र काही वेळा कागदपत्रांची औपचारिकता पूर्ण करूनही अनेक खेळाडूंना त्यांच्या हक्काचे गुण मिळत नाही. असाच काहीसा प्रकार नुकताच उघडकीस आला. या धक्कादायक प्रकारामुळे खेळाडूंसह शिक्षक व पालकांमध्येही सध्या नाराजीचे वातावरण आहे.

हडस हायस्कूलमध्ये दहाव्या इयत्तेत शिकणाऱ्या पीयूष राठोडने काही वर्षांपूर्वी अकोला येथे झालेल्या राज्य सबज्युनिअर खो-खो स्पर्धेत नागपूरचे प्रतिनिधित्व केले होते. या स्पर्धेत नागपूर संघाने विजेतेपद पटकाविले होते. त्यामुळे शासन निर्णयानुसार, त्याला प्रथम क्रमांकाचे २० क्रीडा गुण मिळणे अपेक्षित होते. मात्र गुणपत्रिका हातात आली तेव्हा, त्यात क्रीडा गुणांचा कसलाही उल्लेख नव्हता. पीयूषने दहावीच्या परीक्षेत ८७ टक्के गुण मिळविले. सवलतीचे क्रीडा गुण मिळाले असते तर त्याची टक्केवारी ९१ च्या वर गेली असती.

यासंदर्भात हडस हायस्कूलच्या क्रीडा शिक्षिका डॉ. सारिका जोशी यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, आम्ही पीयूष आणि आणखी एक मुष्टियुद्ध खेळाडू मानस नंदनवारचा क्रीडा गुणांचा प्रस्ताव जिल्हा संघटनेमार्फत निर्धारित तारखेच्या आत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयात सादर केला होता. उल्लेखनीय म्हणजे मानसला स्पर्धेतील सहभागाचे १० क्रीडा गुण मिळाले. पीयूषला मात्र गुण मिळाले नाही. त्याच दिवशी फॉर्म दाखल करणाऱ्या अन्य एका शाळेच्या खेळाडूलाही क्रीडा गुण मिळाल्याचे त्यांनी लक्षात आणून दिले.

अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे

शाळेच्या युवा खेळाडूवर झालेल्या अन्यायासंदर्भात मी अनेक दिवसांपासून जिल्हा क्रीडाधिकारी कार्यालय व शिक्षण विभागात सतत चकरा मारत आहेत. मात्र त्यांच्याकडून कोणताच प्रतिसाद मिळत नाही. सारख्या इकडून तिकडे फेऱ्या मारायला लावत आहेत. उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. संघटनेकडून उशिरा प्रस्ताव आल्यामुळे गुण मिळाले नसल्याचे मला सांगण्यात आले. मात्र यासंदर्भात माहिती घेतली असता, संघटनेने वेळेच्या आतच प्रस्ताव पाठविल्याचे कळाले. त्यामुळे पीयूषच्या बाबतीत नेमके काय घडले, त्याचा फॉर्म गहाळ झाला किंवा तो अपात्र ठरला, याबद्दलही कुणी काहीच सांगायला तयार नसल्याचे डॉ. जोशी म्हणाल्या.

इतर शाळांप्रमाणेच हडसच्याही विद्यार्थ्यांचा क्रीडा गुणांबाबतचा प्रस्ताव आमच्याकडून शिक्षण मंडळाकडे गेला होता. मात्र या शाळेच्या एका खेळाडूला गुण मिळाले आणि दुसऱ्याला मात्र मिळाले नाही. त्यामुळे नेमका घोळ कुठे झाला, हे कळले नाही. यासंदर्भात तक्रार आल्यानंतर पुण्याच्या आयुक्तांसह नागपूरच्याही आयुक्तांना पत्र पाठविले आहे. शिवाय कारणांचा शोध घेण्यासाठी याद्याही चेक करणे सुरू आहे. त्यामुळे लवकरच कारण स्पष्ट होऊन संबंधित खेळाडूला क्रीडा गुण मिळू शकेल.

-पल्लवी धात्रक, जिल्हा क्रीडाधिकारी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com