नागपूर :"हायटेन्शन लाइन'खालील घरे तोडण्यावरून "टेन्शन'

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

नागपूर : महापालिकेने शहरातील "हायटेन्शन लाइन'खालील घरांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. आज वाठोड्यात कारवाई करणाऱ्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. मात्र, पोलिसांनी नागरिकांचा विरोध मोडित काढत घरांचा काही भाग तोडला. या कारवाईमुळे आता नागरिकांत अस्वस्थता वाढली असून, विरोधही वाढत आहे. 

नागपूर : महापालिकेने शहरातील "हायटेन्शन लाइन'खालील घरांविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. आज वाठोड्यात कारवाई करणाऱ्या पथकाला नागरिकांच्या विरोधाला सामोरे जावे लागले. मात्र, पोलिसांनी नागरिकांचा विरोध मोडित काढत घरांचा काही भाग तोडला. या कारवाईमुळे आता नागरिकांत अस्वस्थता वाढली असून, विरोधही वाढत आहे. 

महापालिकेने उच्च न्यायालयाच्या निर्देशावरून शहरातील विविध भागांत हायटेन्शन लाइनखालील घरांविरोधात कारवाईचा धडाका लावला आहे. दररोज घरांचा काही भाग किंवा घरे पाडण्यात येत आहेत. आता या कारवाईला नागरिकांकडून विरोध होत आहे. नेहरूनगर झोनअंतर्गत वाठोडा येथे कारवाईसाठी महापालिकेचे पथक गेले; मात्र नागरिकांनी जोरदार विरोध केला. त्यामुळे काही वेळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. मात्र, पोलिसांनी नागरिकांची समजूत काढली. तरीही पथकाला विरोध सहन करावा लागला. या वेळी पथकाने सरस्वतीबाई नरड यांच्या घराचा काही भाग तोडला. या वेळी सहायक आयुक्त नेहा करपे, उपअभियंता शिंगनजोडे, कनिष्ठ अभियंता खेरडे, नेताम, काकडे उपस्थित होते. महापालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे अवस्थीनगर, अहबाब कॉलनी येथील घरांवर कारवाई केली. येथे दुकान, दवाखाना, जनरल स्टोर्स, मीना ब्युटी पार्लरचे अनधिकृत बांधकाम तोडण्यात आले. स्नेहदीप कॉलनीतील महेश नागमोते यांच्या घराचे शेड, वाहने व जयस्वाल यांच्या घराची बाल्कनी, जिना, पायऱ्या तोडण्यात आल्या. या कारवाईत झोनचे सहायक आयुक्त हरीश राऊत यांच्यासह उपअभियंता, कनिष्ठ अभियंता व इतर अधिकाऱ्यांनी भाग घेतला.

आशीनगर झोनमध्ये समतानगर पॉवर ग्रिड फीडर येथील हायटेन्शन लाइनखालील रत्नमाला जंगम, दसेरिया, हंसराज रामटेके, इंदरराज लिहारे, परमानंद राऊत, प्रकाश खोब्रागडे, देवानंद चावरे, ब्रिजेश चवरे, सुनीता चौधरी, राधा ठाकरे यांच्या घरांचा काही भाग तोडला. ही कारवाई सहायक आयुक्त गणेश राठोड, सहायक आयुक्त अशोक पाटील, उपअभियंता, कनिष्ठ अभियंत्यासह अतिक्रमण विभागाचे तसेच झोनच्या अधिकाऱ्यांनी केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, hightension electric line