वाघ आला रे आला... रात्रीचे ओलीत कसे?

Nagpur : How to work in the field
Nagpur : How to work in the field

कोदामेंढी (जि. नागपूर) : थंडीची लाट वाढली आहे. त्याचबरोबर मागील सहा महिन्यांपासून "वाघ आला रे आला'ची दहशत परिसरात सुरू आहे. रात्रीला घराबाहेर निघू नये, असा संदेश वनविभागाने दिला आहे. मात्र, वीजवितरण कंपनीद्वारे "थ्री फेज' वीजपुरवठा रात्रीला सुरू असल्याने शेतीचे ओलीत करण्यासाठी नाईलाजास्तव जीव धोक्‍यात घेऊन शेतात जावे लागत आहे. त्यामुळे विजेचा "थ्री फेज' पुरवठा दिवसाला सुरू ठेवण्याबाबतचे निवेदन अरोली वितरण कंपनीचे अभियंता यांना देण्यात आले आहे.

अरोली विद्युत उपकेंद्राद्वारे डिसेंबर महिन्यापासून आठवड्यात सोमवार ते बुधवार रात्री 11.20 ते सकाळी 9.20 पर्यंत दहा तास "थ्री फेज' वीजपुरवठा करण्यात येत आहे. सध्या शेतीचा रब्बी हंगाम सुरू असून गहू, हरभरा, पालेभाज्या, फळभाज्या आदी पिकाला ओलीत करणे गरजेचे असते. थंडीचा कडाका भयंकर वाढला असून, परिसरात वाघाची भीती देखील कायम आहे. त्यामुळे इतक्‍या थंडीत आणि वाघाच्या दहशतीत शेतकऱ्यांना जीव धोक्‍यात घेऊन शेतात पाणी ओलायला जावे लागते. शासन जणू शेतकऱ्यांच्या जीवावर उठले की काय, असाही सवाल निर्माण झाला आहे.

तेव्हा सातही दिवस दिवसाला "थ्री फेज' वीजपुरवठा करावा, यासाठी योगेश देशमुख यांच्या नेतृत्वात अडेगावचे माजी सरपंच अनिल बुराडे, अरोलीचे माजी सरपंच नंदू धानकुटे, इंदोराचे उपसरपंच वीरेंद्र सेंगर, पिंटू गिरी, निरंजन मेहर, भोलेश्‍वर धोंगडे, रियाज कादरी, विलास आंबिलडूके, अशोक गजबे यांनी अरोली वितरण कंपनीचे अभियंता सुहास चवळे यांना निवेदन दिले.

शेतकरी भयभीत

भिवापूर तालुक्‍यातील नांद परिसरात वाघाचा वावर वाढला असून, 10 डिसेंबरला पांजरापार शिवारात सायंकाळच्या सुमारास काही ठिकाणी पायाचे ठसे तर पांजरापार-नांद मार्गाने वाहतूकदारांना शेतातून जात असताना वाघ दिसून आला. तसेच बेसूर, पिरावा, पोळगाव परिसरातील शेतकऱ्यांनाही वाघ दिसला. कोरडवाहू पेरणी आटोपली असून, ज्यांच्याकडे ओलीताची सोय आहे किंवा तलावाचे पाणी मिळते, अशा ठिकाणी काही प्रमाणात पेरणी सुरू आहे. भारनियमनामुळे काही दिवस रात्रीला थ्री फेज विद्युत पुरवठा होत असल्याने व रात्रीच्या सुमारास वाघाचा वावर असल्याने शेतकरी भयभीत झाला आहे. त्यामुळे वनविभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

हिरवेगार शेतात वाघ वावरतोय

कित्येक दिवसांपासून या परिसरात वाघाचा वावर सुरू आहे. परिसरात अनेक शेळ्या व जनावरे वाघाने मारले आहेत. परिसरातील झमकोली, बेल्लरपार, भिवी, उरकुडपार, महालगाव, पांजरापार, नांद, लोणारा, वणी, आलेसूर, धामणगाव, खोलदोडा, बेसूर, सिल्लेपार, इंदापूर, खंडारझरी, बोटेझरी, पिरावा, पोळगाव या गावांना जंगल लागून असल्यामुळे नेहमीच वाघ कुठेतरी दिसून येतो. तसेच जंगलात कुठे ना कुठे वाघाने जनावरे मारल्याची बातमी ऐकायला मिळते. आता तर जंगली भाग सोडून खुल्या हिरवेगार शेतात वाघ वावरत असल्याचे अनेक शेतकऱ्यांनी बघितले आहेत. त्यामुळे शेतकरी वाघाच्या दहशतीने भयभीत झाला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com