हे देवा! निवासी गाळे झाले सायकल स्टॅण्ड

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 13 डिसेंबर 2019

मेडिकलमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी अजनी रेल्वेस्थानकासमोर निवासी गाळे आहेत. येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी राहतात. मात्र, येथील रहिवाशांनी अधिक कमाईच्या लालसापोटी अवैध सायकल स्टॅण्ड लावल्याची माहिती पुढे आली आहे. एका वाहनासाठी दरमहा किमान तीनशे रुपये भाडे आकारण्यात येत असल्याची चर्चा आहे. 

नागपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आशियाखंडातील सर्वांत मोठे शासकीय रुग्णालय आहे. दररोज मोठ्या संख्येने रुग्ण येथे उपचारासाठी येतात. विदर्भासह मध्यप्रदेश, आंद्रप्रदेश, छत्तीसगड आदी ठिकाणांहून रुग्ण रोज येत असतात. रुग्णांची देखरेख करण्यासाठी येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱ्यांचे निवासी गाळे अजनी रेल्वेस्थानकासमोर आहेत. येथील निवासी गाळ्यांमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त कमाईसाठी नवीन फंडा सुरू केला आहे. कर्मचाऱ्यांनी गाळ्यांमध्ये अवैध सायकल स्टॅण्ड लावल्याची माहिती पुढे आली आहे.

अजनी रेल्वेस्थानकावरून वर्धेच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्यातून नागपूरचे अनेक चाकरमाने प्रवास करतात. नोकरीच्या निमित्ताने वर्धा, बुटीबोरी, हिंगणघाट, समुद्रपूर येथे शासकीय तसेच खासगी कंपनीत ते कामाला आहेत. या प्रवासादरम्यान आपले दुचाकी वाहन सुरक्षित असावे या हेतूने रेल्वे स्थानकावरील सायकल स्टॅण्डवर न ठेवता या परिसरात असलेल्या मेडिकलच्या कर्मचाऱ्यांच्या निवासी गाळ्यांमध्ये ठेवत असल्याचे दिसून येते.

 

असे का घडले? - अंत्यसंस्काराला गेले अन्‌ दुचाकी गमावून बसले

 

अनेकदा रेल्वे सायकल स्टॅण्डवर वाहन सुरक्षित नसते, वाहनातून पेट्रोलच्या चोरीपासून तर हेल्मेट चोरीच्या अनेक घटना पुढे आल्यामुळे चाकरमान्यांनी हा नवा पर्याय शोधून काढला आहे. अजनी स्थानकाच्या समोर सुमारे शंभरावर निवासी गाळे आहेत. यातील अनेक गाळ्यांच्या समोर दुचाकी वाहनांची गर्दी दिसते. एका गाळ्यासमोर किमान दहा ते बारा दुचाकी वाहन दिवसाला दिसतात. रात्री आठ वाजेपर्यंत ही दुचाकी वाहने येथे दिसतात. सकाळी सहा वाजतापासून तर रात्री आठ वाजेपर्यंत ही वाहने निवासी गाळ्यांमध्ये असतात.

तीनशे रुपये महिना

अधिक कमाईसाठी गाळ्यांतील रहिवाशांनी वाहन पार्किंगचा नवा व्यवसाय सुरू केला आहे. एका वाहनासाठी दरमहा किमान तीनशे रुपये भाडे आकारण्यात येत असल्याची चर्चा आहे. मेडिकलमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा केली असता, हा प्रकार अवैध आहे. एखादी अनुचित घटना घडल्यास संबंधित कर्मचारी जबाबदार राहणार असून, त्याच्यावर कारवाई करण्याचे संकेतही दिले.

 

हेही वाचा - कॉपर सलूनच्या उभारणीत डॉन आंबेकरचा पैसा! 

 

वाहनांची संख्या वाढविण्याची शक्कल

अनेक चाकरमाने तीनशे रुपये देतात. मात्र, काही निवासी गाळ्यांमध्ये वाहनांची संख्या कमी दिसते. यामुळे पुढील महिन्यात हे गाळेधारक तीनशे रुपयांऐवजी 250 रुपये असा भाव करतात. यामुळे त्या निवासी गाळ्यांमध्ये गाड्यांची संख्या आपोआपच वाढलेली दिसते. अशाप्रकारे दुचाकी वाहनांची संख्या वाढविण्याची शक्कल गाळेधारक करीत असल्याचीही चर्चा मेडिकलमधील कर्मचाऱ्यांमध्ये आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nagpur : Illegal parking in residential lane