दहशत; वायुसेना नगरातील जंगलात बिबट

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

कारने अमरावती मार्गावरून दाभाकडे जाणाऱ्या मार्गाने जंगलातून काही कामानिमित्त जात असताना त्यांच्या वाहनासमोरून अचानक बिबट्याने रस्ता ओलांडला.

वाडी : मागील तीन दिवसांपासून वर्धा मार्गावर वाघ दिसल्याने सर्व नागरिक चिंताग्रस्त असतानाच शुक्रवारी रात्री नऊच्या दरम्यान वाडीजवळील दाभा वायुसेनानगर येथील जंगलात रस्त्यावर बिबट दिसल्याची माहिती नागरिकांनी वाडी पोलिसांना दिली.

शुक्रवारी रात्री 9च्या सुमारास युवासेनाचे हर्षल काकडे व राष्ट्रवादी कॉंग्रेस सामाजिक न्याय आघाडीचे जिल्हाध्यक्ष संतोष नरवाडे त्यांचे सहकारी क्रांतीसिंह व इतर कारने अमरावती मार्गावरून दाभाकडे जाणाऱ्या मार्गाने जंगलातून काही कामानिमित्त जात असताना त्यांच्या वाहनासमोरून अचानक बिबट्याने रस्ता ओलांडला. हे पाहून कारमधील सर्वच अवाक्‌ जाले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तो बिबट असावा असा अंदाज लावण्यात आला आहे. या घटनेची माहिती तातडीने वायुसेना प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या शिपायांना देण्यात आली. सोबतच वाडीचे ठाणेदार राजेंद्र पाठक यांनाही सूचना देण्यात आली. पोलिस व वायुसेना विभाग दोन्हीही शनिवारी सकाळी या घटनेची अधिक चौकशी करणार आहेत.

सूचना मिळताच वनविभाग व पोलिस नियंत्रण कक्षाला सूचना प्रसारित करण्यात आली. तातडीने वायुसेना सुरक्षा विभागाला माहिती देऊन दाभा मार्ग बंद करण्यात आला आहे. स्थितीवर पूर्णपणे लक्ष ठेवून आहोत.
-राजेंद्र पाठक, ठाणेदार, वाडी

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, leopard, air force, forest, panic