नागपूर हत्याकांड : तीन महिन्यांपूर्वीच रचला कट 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 17 एप्रिल 2019

तीन कोटींच्या संपत्तीची मालकीण होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून करण्याचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचला होता. तीनवेळा प्रयत्नही फसले. त्यामुळे मुलीनेच पुढाकार घेऊन कोयत्याने आई-वडिलांचा निर्घृण खून केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नागपूर - तीन कोटींच्या संपत्तीची मालकीण होण्याचे स्वप्न बघणाऱ्या मुलीने आपल्या प्रियकराच्या मदतीने खून करण्याचा कट तीन महिन्यांपूर्वीच रचला होता. तीनवेळा प्रयत्नही फसले. त्यामुळे मुलीनेच पुढाकार घेऊन कोयत्याने आई-वडिलांचा निर्घृण खून केल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्‍त नीलेश भरणे यांनी पत्रकार परिषदेत दिली. दोघांनाही 22 एप्रिलपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्यात आले आहे. 

ऐश्वर्या ऊर्फ प्रियंका चंपाती (वय 23) व तिचा प्रियकर इखलाक खान (वय 23, रा. वडधामना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. शंकर अतुलचंद्र चंपाती (वय 72) व सीमा शंकर चंपाती (वय 64, दोन्ही रा. दत्तवाडी) ही मृतांची नावे आहेत. ऐश्‍वर्या ही आठ महिन्यांची असताना तिच्या आईचा मृत्यू झाला, तर वडिलांनी लगेच दुसरे लग्न केले. चिमुकल्या ऐश्‍वर्याला शंकर आणि सीमा चंपाती या दांपत्याने दत्तक घेतले. तिला स्वतःच्या अपत्याप्रमाणे लहानाचे मोठे केले. उच्चशिक्षित बनविले. ती आयटी इंजिनिअर आहे. एका सॉफ्टवेअर कंपनीत नोकरीलाही आहे. दहावीत असताना ट्यूशन क्‍लासेसमध्ये इखलाक खान याच्याशी ओळख झाली. तेव्हापासून दोघांचे प्रेमप्रकरण सुरू होते. इखलाक हा क्रिकेटर असून तो देश-विदेशांत क्रिकेट खेळलेला आहे. चार महिन्यांपूर्वी प्रेमप्रकरणाची कुणकूण शंकर यांना लागली. त्यामुळे त्यांनी दत्तवाडीतील घर विकण्याची तयारी चालविली होती. दीड कोटीमध्ये घर विकून पुण्याला स्थायिक होण्याची शंकर यांची योजना होती. वडील प्रेमात अडसर ठरत आहेत. ते घर विकण्याच्या तयारीत असल्याचे ऐश्वर्याने इखलाकला सांगितले. तेव्हापासून इखलाक आणि ऐश्‍वर्याने आईवडिलांचा काटा काढण्याचे ठरविले. पहिला प्रयत्न जानेवारीला केला, तर त्यानंतर फेब्रुवारीत दोनदा प्रयत्न फसले. मात्र, शंकर व सीमा हे सुदैवाने त्यातून बचावले. 

ऐश्‍वर्यानेच आखला कट 
तीनदा प्रयत्न करूनही यश येत नव्हते. त्यामुळे ऐश्‍वर्यानेच पुढाकार घेत आईवडिलाचा खून करण्याची योजना आखली. इखलाकने आणून दिलेल्या झोपेच्या गोळ्या खरबुजातून आईवडिलांना खाऊ घातल्या. दोघेही झोपल्याचे लक्षात येताच इखलाकला घरी बोलावले. त्यावेळी ऐश्‍वर्याने कुत्र्याला बांधून ठेवले. नंतर ती घरातून बाहेर पडली. इखलाकने कोयत्याने शंकर आणि सीमा यांचे गळे कापले. 

वाडी पोलिसांचा हलगर्जीपणा 
वाडी पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे वृद्ध दांपत्याला जीव गमवावा लागला. यापूर्वी शंकर चंपाती यांनी वाडी पोलिस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध मारहाण करणे, तसेच धमकी देण्यासंदर्भात वाडी पोलिस ठाण्यात लेखी तक्रार केली. मात्र, ज्येष्ठ नागरिक असतानासुद्धा त्यांच्या तक्रारीवर कोणतेही गांभीर्य न दाखवता त्यांना कोर्टात जाण्याची समज देण्यात आली. वाडी पोलिसांनी माणुसकीचा परिचय दिला असता, तर आज वृद्ध दांपत्याचा जीव गेला नसता. 

दरोड्याचा केला बनाव 
शंकर आणि सीमा यांचा खून केल्यानंतर ऐश्‍वर्याने सांगितलेल्या ठिकाणी ठेवलेले एक लाख रुपयांचे दागिने इखलाकने चोरून नेले. त्यानंतर घरातील सामान अस्ताव्यस्त करून ठेवले. त्यानंतर चोरी करण्याच्या उद्देशाने हे हत्याकांड घडले असावे, असे पोलिसांना वाटावे म्हणून देखावा निर्माण करून ठेवला. 

असे सापडले आरोपी 
आपल्यावर पोलिसांचा संशय येऊ नये म्हणून ऐश्‍वर्याने तीन दिवसांपूर्वी आपले फेसबूक व जी-मेल अकाउंट बंद केले. तिने कंपनीकडूनही ते खाते बंद करायला लावले. इखलाकनेही आपले फेसबूक खाते बंद केले होते. दोघांनी दोन महिन्यांपासून मोबाईलवरून संपर्क साधला नाही. बोलायचे असल्यास वॉट्‌सऍप कॉलवरून संपर्क करायचे. हत्याकांड घडले त्यावेळी ऐश्‍वर्या ही ब्यूटी पार्लरमध्ये नंतर बिग बाजारमध्ये होती. सायंकाळी गार्डनमध्ये योजनेनुसार फिरत होती. तसेच प्रत्यक्षदर्शी पुरावा म्हणून कामठी येथे राहणारी मावसबहीण मेघा आणि तिचा प्रियकर सौरव यांनाही दिवसभर सोबत ठेवले. मात्र, पोलिसांना ऐश्‍वर्याचे हेच नियोजन पोलिसांना खटकले. 

150 वेळा वॉट्‌सऍप कॉल 
वृद्ध दांपत्याच्या खून करण्यापूर्वी ऐश्‍वर्या व इखलाक हे व्हॉट्‌सऍपच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. व्हॉट्‌सऍपद्वारे त्यांनी दिवसभरात 150 वेळा एकमेकांशी संपर्क साधला. वॉट्‌सऍप कॉलवरूनच खुनाचे नियोजन केले. खुनानंतर त्यांनी व्हॉट्‌सऍप कॉलची माहिती ऍपवरून मिटवली. 

मोबाईलचे लोकेशन बदलण्याचा प्रयत्न 
प्रियंका ही संगणक अभियंता आहे. तिने पोलिसांना चकवण्यासाठी व खुनाचा आळ दुसऱ्यावर यावा म्हणून स्वत:चे व प्रियकराच्या मोबाईलचे लोकेशन वाडी परिसरात येऊ नये, अशी व्यवस्था केली होती. तिने संगणक तंत्रज्ञानाचा वापर करून स्वत:चे लोकेशन त्यावेळी दुसरीकडे दाखवले. पण, पोलिसांनी तिच्या कॉल डिटेल्स रेकॉर्डचा (सीडीआर) अभ्यास करून दोघांनाही ताब्यात घेतले व कसून चौकशी केली. शेवटी प्रियकराने खुनाची माहिती दिली व भंडाफोड झाला.

Web Title: Nagpur massacre conspiracy to murder was done three months ago