मेट्रोचे सत्य संकल्पनेपेक्षाही सुंदर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

नागपूर : शहरातील महत्त्वाकांक्षी मेट्रो रेल्वेचे काम नागपूरकरांसाठी नेहमीच उत्सुकतेचा विषय ठरले. विशेष म्हणजे महामेट्रोने कामाला सुरुवात होण्यापूर्वी प्रत्येक स्टेशन, चौकातून मेट्रोच्या प्रवासाचे आकर्षक संकल्पना चित्र काढले होते. या संकल्प चित्रानुसार कामे पूर्ण झाली असून, व्हेरायटी चौकातील उड्डाणपुलावरून धावणाऱ्या मेट्रो रेल्वेला बघता अनेक जण मेट्रोचे वास्तविक रूप संकल्पनेपेक्षाही सुंदर असल्याची चर्चा रंगली आहे.

गेल्या चार वर्षांतील अथक परिश्रमानंतर शहरात मेट्रो धावत आहे. मेट्रोने प्रत्येक कामाचे डिझाईन तयार केले होते. या डिझाईन किंवा संकल्पना चित्रापेक्षाही मेट्रोचे धावते रूप आकर्षक वाटू लागल्याच्या प्रतिक्रिया मेट्रोकडे येत आहेत. प्रस्तावित डिझाईन प्रत्यक्षात साकारल्यानंतर सत्य आणि कल्पनेतील फरक ठळकपणे नागपूरकरांच्या लक्षात येत आहे. व्हेरायटी चौकातील मेट्रो ट्रॅक शहीद गोवारी उड्डाणपुलावरून आहे. त्यामुळे येथे एकप्रकारे "क्रॉस'चे संकल्पना चित्र तयार केले होते. आता प्रत्यक्षात पूर्ण झाल्यानंतर व्हेरायटी चौक येथील कार्य हुबेहूब उतरले किंबहुना चित्रापेक्षाही अधिक आकर्षक असल्याचे मत जगदीश पाटमासे यांनी नमूद केले. महामेट्रोने स्थानिकांच्या इमारती, पिलर, पूल, डबल डेकर पुलाचे संकल्पनाचित्र तयार केले. ही कामे पूर्णत्वास येत असून, त्यावरील रंगरंगोटी आणि प्रकाशयोजनेमुळे ठरावीक परिसरच नाही तर शहराचे रूप देखणे आणि चित्ताकर्षक होत आहे. बाहेरून नागपूरकडे येणारे व्यापारी आणि पर्यटकांसाठी हे शहर आता आकर्षणाचे केंद्र ठरू लागले आहे. शहराचे मुख्य व्यावसायिक केंद्र मानल्या जाणाऱ्या सीताबर्डी भागात ये-जा करणे मेट्रोमुळे सहज झाले. याशिवाय सार्वजनिक वाहतूक सेवा अधिक प्रबळ झाल्याने पुढल्या काही काळात येथील व्यवसायालाही अधिक सुगीचे दिवस येतील, असा विश्‍वास व्यापारी व्यक्त करीत आहेत. सीताबर्डी परिसरात उड्डाणपुलावर "स्टील गर्डर ब्रिज' तयार केले आहे. संकल्प चित्रापेक्षा प्रत्यक्षात बांधकामानंतरचा पूल आकर्षक आणि देखणा झाल्याचे दिसून येते.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur metro news