भागवत- मुनगंटीवार भेटीचा राजकारणाशी संबंध नाही

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 नोव्हेंबर 2019

मुनगंटीवार यांनी सरसंघचालकांना मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली. त्यांच्या बोलण्यात राजकीय चर्चा असण्याचा किंवा शिवसेना नेत्यांना सरसंघचालकांनी फोन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

नागपूर : बुधवार दि.13 रोजी माजी मंत्री आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची घेतलेली भेट केवळ मुनगंटीवारांच्या मुलीच्या लग्नाची पत्रिका देण्यापुरती मर्यादित होती. त्या भेटीचा राज्यातील राजकीय स्थितीशी संबंध नाही, असे स्पष्टीकरण रा. स्व. संघाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. 

संघाचे महानगर संघचालक राजेश लोया, विदर्भ प्रांत प्रचार प्रमुख अनिल सांबरे, महानगर सहकार्यवाह रवींद्र बोकारे आणि महानगर प्रचार प्रमुख समीर गौतम यांनी आज ता. 14 रोजी "सत्तेच्या भांडणात नागपूरची मध्यस्थी? या मथळ्यासह "सकाळ"मध्ये प्रकाशित झालेल्या बातमीच्या संदर्भात माहिती देताना सांगितले, की मुनगंटीवार यांनी काल सरसंघचालकांना मुलीच्या लग्नाची पत्रिका दिली. त्यांच्या बोलण्यात राजकीय चर्चा असण्याचा किंवा शिवसेना नेत्यांना सरसंघचालकांनी फोन करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

पक्षीय राजकारणात संघ कधीही सहभाग घेत नाही. त्यामुळे मुनगंटीवार यांनी घेतलेल्या भेटीत राजकीय चर्चा झाली किंवा सत्ता स्थापनेसंदर्भात फोन केला गेला, ही माहिती निराधार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur, mohan bhagvat, sudhir mungantivar