नागपूर महापालिकेला मिळेना आयुक्त

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 29 एप्रिल 2018

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरातील महापालिका गेल्या दहा दिवसांपासून आयुक्तांशिवाय असून जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. नासुप्रचे सभापती व एनएमआरडीचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचीही बदली झाली असून अद्याप कुणी अधिकारी न आल्याने प्रभार कुणाकडे द्यावा? या पेच आहे. यामुळे नागपूरसाठी सक्षम अधिकाऱ्यांची राज्य शासनाकडे वाणवा असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. 

नागपूर - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याच शहरातील महापालिका गेल्या दहा दिवसांपासून आयुक्तांशिवाय असून जिल्हाधिकाऱ्यांकडे अतिरिक्त प्रभार देण्यात आला आहे. नासुप्रचे सभापती व एनएमआरडीचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचीही बदली झाली असून अद्याप कुणी अधिकारी न आल्याने प्रभार कुणाकडे द्यावा? या पेच आहे. यामुळे नागपूरसाठी सक्षम अधिकाऱ्यांची राज्य शासनाकडे वाणवा असल्याची चर्चा यानिमित्त रंगली आहे. 

मनपा आयुक्त अश्‍विन मुदगल यांची १२ दिवसांपूर्वी नागपूरचे जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली. दहा दिवसांपूर्वी त्यांनी जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार स्वीकारला. मात्र, महापालिकेला राज्य शासनाने अद्याप आयुक्त न दिल्याने गेल्या दहा दिवसांपासून ते दुहेरी जबाबदारी सांभाळत आहे. आयुक्तपदाची जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली. परंतु आता जिल्हाधिकारीपदासह आयुक्तपदही सांभाळण्याची कसरत त्यांना करावी लागत आहे. कधी जिल्हाधिकारी कार्यालय तर कधी महापालिका, अशा दररोज त्यांना फेऱ्या माराव्या लागत आहे. 

महापालिकेत आयुक्त असल्यामुळे  शहरातील अनेक विकास कामे त्यांच्या नजरेपुढे आहे. या कामांसंबंधीची माहिती असल्याने ते निर्णय घेतात. परंतु नागपूरचे म्हणून अद्याप रुळले नसल्याने तेथील ’सिस्टिम’ समजून घेण्यासाठी त्यांना आवश्‍यक अवधी मिळत नसल्याचे चित्र आहे.

त्यातच शहराच्या विकासासाठी असलेल्या नासुप्रचे सभापती व एनएमआरडीएचे आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांचीही बदली झाली. मुळात एका अधिकाऱ्याची बदली झाल्यानंतर लगेच सक्षम अधिकारी पाठविणे अपेक्षित आहे. परंतु शहरातील महापालिकेचे आयुक्त, नासुप्र सभापती, एनएमआरडीएचे आयुक्त प्रभारी आहेत. मुख्यमंत्र्यांना स्वतःच्या शहरासाठीच सक्षम अधिकारी सापडत नाही काय? असे प्रश्‍न आता चर्चेत आहे.

एकच अतिरिक्त आयुक्त
शहर वाढले, नगरसेवकांची संख्या वाढली.या सर्वांच्या अपेक्षांचा भार सध्या एकाच अतिरिक्त आयुक्तांना उचलावा लागत आहे. हेमंतकुमार पवार यांची मे २०१६ मध्ये बदली झाल्यानंतर महापालिकेत केवळ दोनच अतिरिक्त आयुक्त होते. नुकताच आर. झेड. सिद्दीकी निवृत्त झाले. त्यामुळे आता रविंद्र कुंभारे हे एकमेव अतिरिक्त आयुक्त आहेत.

’बार्गेनिंग’मध्ये रखडले आयुक्त? 
नागपूर वेगाने विकासाकडे आगेकूच करीत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांच्यामुळे केंद्र व राज्य सरकारकडून मोठ्या प्रमाणात शहराला निधी मिळत आहे. योग्य ठिकाणी बदली करून घेण्यासाठी प्रशासनात ’बार्गेनिंग’ नवे नाही. नागपूर महापालिकेसाठी अधिकाऱ्यांची वरिष्ठ पातळीवर ’बार्गेनिंग’ सुरू असल्याची चर्चा आहे. 

Web Title: nagpur municipal commissioner