'स्मार्ट' कामांनी बदलली आयुक्तपदाची व्याख्या 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 एप्रिल 2017

सायकलने शहरभ्रमण 
सायकलिंग हा त्यांचा आवडता छंद होता. त्यांनी शहरात सायकल स्पर्धेतही भाग घेतला. मात्र, या छंदाचा वापरही त्यांनी शहरासाठी केला. रात्रीला शहरात सायकलने फिरून नागरिकांशी संवाद साधला तर कधी स्वच्छतेबाबत जनजागृती केल्याचेही अनेकदा दिसून आले. 

नागपूर - मनपाचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीमुळे महापालिकेतील गेले अडीच वर्षे त्यांच्यासोबत कामे करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी खंत व्यक्त केली. स्मार्ट सिटी विकास आराखडा, नाग नदी स्वच्छता अभियानासाठी जनतेपर्यंत पोहोचून त्यांनी शहराच्या विकासासाठी सहकार्य मिळविले. नागरिकांच्या समस्यांचीही जाणीव ठेवत त्या निकाली काढण्यासाठी अवलंबविलेल्या 'स्मार्ट' उपाययोजनामुळेही श्रावण हर्डीकर गेली अडीच वर्षे नागपूरकरांच्या रंगात रंगले. दरम्यान, नवे आयुक्त अश्‍विन मुदगल याच आठवड्यात त्यांच्याकडून सुत्रे स्वीकारणार आहेत. 

महापालिकेत बदली होऊन येताच आर्थिक टंचाईशी दोन हात करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. मात्र, गेल्या अडीच वर्षात त्यांनी आर्थिक संकटामुळे शहराच्या विकासावर परिणाम होऊ दिला नाही, यातूनच त्यांच्यातील अर्थशास्त्रीचेही नागपूरकरांना दर्शन झाले. विशेष म्हणजे त्यांनी शहराच्या विकासासाठी लोकांच्या सहभागाकरिता उचलेले पाऊल कौतुकास्पद ठरले. स्मार्ट सिटी प्रकल्पाचा आराखडा तयार करताना साडेतीन लाख नागरिकांची मते मागविण्यात आली. यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर स्वतः लोकापर्यंत पोहोचले. त्यामुळे प्रथमच नागपूरकरांना आयुक्त आपल्यातीलच असल्याची जाणीव झाली अन्‌ शहर विकासाच्या मार्गातील अनेक अडथळे दूर झाले. स्मार्ट सिटी प्रकल्प काय आहे, त्यातून शहर कसे बदलणार, याचे सादरीकरण त्यांनी स्वतः नागपूरकरांपुढे केले, शिवाय नागपूर स्मार्ट झाल्यानंतर निर्माण होणाऱ्या रोजगार, शिक्षणांच्या संधीबाबत देशी, विदेशी संस्थांपुढेही शहराचा गुणगान केले.

त्यामुळे दर आठवड्याला एक तरी विदेशी कंपन्यांचे शिष्टमंडळ महापालिकेत दिसून आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रियमंत्री नितीन गडकरी या दोन्ही नेत्यांच्या अपेक्षांना कुठेही धक्का न लावता त्यांनी राजकीय परिपक्वताही दाखविली. या तरुण अधिकाऱ्याची बदली महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांच्या पचनी पडली नाहीच, शिवाय नागरिकांनाची रुचली नाही. गेली अडीच वर्षे त्यांच्यासोबत काम करणारे माजी महापौर प्रवीण दटके, माजी सत्तापक्ष नेते दयाशंकर तिवारी, माजी विरोधी पक्षनेते विकास ठाकरे यांनी त्यांच्या कामाच्या पद्धतीवर कौतुकाचा वर्षाव केला. 

सायकलने शहरभ्रमण 
सायकलिंग हा त्यांचा आवडता छंद होता. त्यांनी शहरात सायकल स्पर्धेतही भाग घेतला. मात्र, या छंदाचा वापरही त्यांनी शहरासाठी केला. रात्रीला शहरात सायकलने फिरून नागरिकांशी संवाद साधला तर कधी स्वच्छतेबाबत जनजागृती केल्याचेही अनेकदा दिसून आले. 

पंधरा वर्षे महापालिकेत आहे. परंतु त्यांच्यासारखी चपळता मी आतापर्यंत एकाही अधिकाऱ्यात बघितली नाही. सामान्यांच्या समस्येची जाणीव आणि प्रशासनस्तरावर तत्काळ व योग्य निर्णय घेण्याच्या त्यांच्या क्षमतेमुळे स्मार्ट सिटी आराखडा, पार्किंग धोरण वेळेत तयार झाले. त्यांनी निश्‍चितच नागपुरात चांगल्या कामाने छाप पाडली. 
- प्रवीण दटके, माजी महापौर. 

सत्ताधारी तसेच विरोधक दोघांनाही श्रावण हर्डीकर यांनी योग्य पद्धतीने हाताळले. अत्यंत सावधपणे त्यांनी कामे केली. मात्र, शहराच्या विकासात कुठेही अडथळा येऊ दिला नाही. साध्या फोनवरून तक्रारीची दखल घेत असल्याने नगरसेवकांतही ते लोकप्रिय होतेच. चांगल्या अधिकाऱ्यांच्या बदलीची निश्‍चित खंत आहे. 
- विकास ठाकरे, माजी विरोधी पक्षनेते. 

जनतेची मते घेणे आणि कमी वेळेत स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करण्याचे आव्हान त्यांच्यापुढे होते. मात्र, त्यांनी संयमाने स्मार्ट सिटीचा प्रस्ताव तयार करून केंद्राची मंजुरी मिळविली. स्वामी विवेकानंद स्मारकाच्या कामात अनेक बदल झाले. परंतु ते बदल सकारात्मक घेत शहराच्या सौंदर्यात भर घालणारा हा प्रकल्प वेळेत पूर्ण केला. 
- दयाशंकर तिवारी, माजी सत्तापक्ष नेते. 

Web Title: Nagpur Municipal Commissioner Shravan Hardikar transferred