23 प्रभागांमध्ये शतप्रतिशत यश 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 फेब्रुवारी 2017

नागपूर - नागपुरातील 38 प्रभागांपैकी 23 प्रभागांमध्ये पॅनेल मतदान झाले. यात भाजपने आघाडी घेतली. भाजपने 18 प्रभागांमध्ये शतप्रतिशत यश संपादन केले आहे. 

नागपूर - नागपुरातील 38 प्रभागांपैकी 23 प्रभागांमध्ये पॅनेल मतदान झाले. यात भाजपने आघाडी घेतली. भाजपने 18 प्रभागांमध्ये शतप्रतिशत यश संपादन केले आहे. 

राज्य सरकारने नागपुरात चार वॉर्डांचा एक प्रभाग करून नवी राजकीय खेळी खेळली होती. ही खेळी भाजपने जिंकल्याचे मतमोजणीनंतर स्पष्ट झाले आहे. नागपुरात 38 प्रभागांची रचना करण्यात आली. त्यापैकी भाजपला 18 प्रभागांमध्ये शतप्रतिशत यश मिळाले आहे. म्हणजे भाजपच्या 108 नगरसेवकांपैकी तब्बल 72 नगरसेवक केवळ 18 प्रभागातूनच निवडून आले आहेत. उर्वरित 26 नगरसेवक हे 20 प्रभागांतून निवडून आले आहेत. नागपूर शहरात भाजपला अभूतपूर्व यश मिळालेले असताना शहरातील 6 प्रभागांमध्ये मात्र भाजपला खाते उघडता आले नाही. प्रभाग क्रमांक 2, 6 ते 10 या प्रभागांमध्ये भाजपचा एकही नगरसेवक निवडून आला नाही. हे सर्व प्रभाग पश्‍चिम व उत्तर नागपूर विधानसभा मतदारसंघातील आहेत. या दोन्ही मतदारसंघांमध्ये भाजपचे आमदार निवडून आलेले असताना या प्रभागांमधून भाजपचा एकही नगरसेवक निवडून आला नाही, हे विशेष. 

कॉंग्रेसला केवळ 4 प्रभागांमध्ये शतप्रतिशत यश मिळाले आहे. यात प्रभाग क्रमांक 2, 8, 10 व 38 चा समावेश आहे. यात प्रभाग क्रमांक 2 हा उत्तर नागपुरातील तर प्रभाग क्रमांक 8 हा मध्य नागपूर व प्रभाग 10 हा पश्‍चिम नागपुरातील आहे. विशेष म्हणजे प्रभाग क्रमांक 38 हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दक्षिण-पश्‍चिम विधानसभा मतदारसंघातील प्रभाग आहे. या प्रभागात मुख्यमंत्र्यांनी प्रचार सभा घेतली होती. तरीही कॉंग्रेसने निर्भेळ यश मिळविले, हे विशेष. या प्रभागातून प्रफुल्ल गुडधे पाटील निवडून आले. बहुजन समाज पक्षाने एका प्रभागात शतप्रतिशत बाजी मारली. उत्तर नागपुरातील प्रभाग क्रमांक 6 मध्ये बसपचे चारही उमेदवार निवडून आले. प्रभाग क्रमांक 7 मध्ये बसपचे तीन नगरसेवक निवडून आले आहेत. बसपने उत्तर नागपुरातील आपला प्रभाव कायम राखला आहे. 

Web Title: nagpur municipal corporation bjp